न हरवलेला पेन
उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार असल्यामुळे आजोबांनी तन्वी आणि तन्मयसाठी 'मराठी म्हणींचा' छान उपक्रम करायचा असे ठरवूनच टाकले होते. तशी इच्छा त्यांनी बच्चेकंपनीला बोलूनही दाखवली होती. आता सुटीचा एक आठवडा उलटला होता. पण दोघी मुलं मात्र मस्ती, खेळ, बाहेर हुडकणे यातच गुंगून गेलेली होती. घरातील इतर मंडळी कायमच कामात व्यस्त राहत. परंतु सध्या या दोघांसाठी काय रविवार नि काय सोमवार, सगळे दिवस एकसारखेच होते. मात्र आजोबांना याचा विसर पडलेला नव्हता. मग आज आजोबांची योजना जवळजवळ तयारच होती. त्याप्रमाणे आई, बाबा आणि आजोबा कामाला लागले.
सकाळी नेहमीप्रमाणे दोघे भावंडे निवांत उठण्याच्या बेतात होते पण आजोबांचा कल्ला ऐकला आणि दोघेही डोळे चोळतच हॉलमधे आले. आजोबा त्यांचा 'न हरवलेला चष्मा' शोधत होते. सर्वजण-आई, बाबा,आजोबा शोधाशोध करू लागले तसे तन्वी आणि तन्मयही नाखुशीनेच सामील झाले. हा सर्व गोंधळ आजी व्हीलचेअरवर बसून बघत होती. मुलांच्या हळव्या चेहऱ्याकडे बघून ती गालातल्या गालात हसतही होती. तन्वी-तन्मयशी नजरानजर होताच आजी मान खाली घालून हळूच 'शोधा, शोधा' म्हणत त्यांना दाद देत होती.
"आजोबा,चष्मा तर तुमच्या डोक्यावरच आहे", काहीशा शोधाशोधीनंतर तन्मय मोठमोठ्याने हसून म्हणाला.
"अरेच्चा! काखेत कळसा गावाला वळसा",आजोबा चष्मा मिळाल्याच्या खुशीत चटकन बोलले.
एऱ्हवी प्रश्न विचारून भांडावून सोडणाऱ्या दोघांनी आजोबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले की त्यांना ती म्हण समजली असावी की नसावी या नवीनच गोंधळात आई-बाबा होते. सुट्टी म्हणजे मस्ती सोबतच सुट्टीचा सदुपयोगही करायचा हा कुटुंबाचा मुलांसाठीचा नियम याचा दोघांना विसर पडला होता. शिक्षकी पेशा असलेल्या त्यांना हे काही रुचले नव्हते.
"हरकत नाही पुन्हा प्रयत्न करूया", आई-बाबांना असे चिंताग्रस्त पाहून आजोबा उत्तरले.
तसा तिघांनी काहीसा सुस्कारा सोडला आणि आपापल्या कामात पुन्हा गुंतून गेले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी दोघेही मित्रांसोबत खेळायला निघाले.
"मुलांनो, तुम्ही मला वाढदिवसाला दिलेला पेन बहुतेक हरवला असावा", आजोबा म्हणाले.
हे ऐकून घराच्या परसबागेत पोहचलेले दोघे पळतच घरात आले. आजोबांना काय द्यावे म्हणजे ते कायम आठवण जपून ठेवतील व खुश होतील, यावर इतका विचार करून दिलेला पेन हरवला हे ऐकून मुलं अगदी कोमेजून गेली.
दोघांनी चिडचिड करत का होईना खूप शोधाशोध केली. बाहेर मित्रमंडळी खेळ सुरूच करणार होते हे जाणून असल्यामुळे मनोमन त्रागाही करत होते. थकून, रडवेले झालेले दोघेही हार मानून सोफ्यावर बसले.
आजोबांनी विचारणा केली, "इतक्यात शोध संपलाही ? अरे बाळांनो, जरा धैर्याने विचार तर करा…"
काहीशा विचारानंतर तसा मुळातच हुशार असलेला तन्मय पळतच त्याच्या रूममध्ये गेला आणि धापा टाकत ड्रॉवरमधून पेन घेऊन आला. तन्वीने टुणकन उडी मारून तन्मयकडे झेप घेतली. सर्वच खुशीत एकमेकांना हाय-फाय देत होते. पण तन्मय मात्र काहीसा ओशाळला होता. कारण पर्वा सकाळी आईने सांगितलेली किराणा यादी करायला तो पेन त्यानेच घेतला होता जो मालमध्ये जाण्याच्या घाईत स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्येच ठेवला गेला होता. त्याला पर्वाचीच गोष्ट आणि आज आपण विसरलोही याचे काहीसे वाईट वाटले.
पण आजोबांच्या म्हणींच्या उपक्रमाची आठवण झाली तसे दोघेही हसून एकसुरात म्हणाले,"अरेच्चा! काखेत कळसा गावाला वळसा..."
सगळयांनी त्यांना हसून दाद दिली. आता खऱ्या अर्थाने 'नियम' आणि 'उपक्रम' दोन्हीही पार पडले होते. आणि आजोबांचा न हरवलेला पेन हसत-खेळत सापडला होता.
तात्पर्य: आपल्या जवळच असलेली गोष्ट/वस्तू आपण दूरवर सर्वत्र शोधतो म्हणजे "काखेत कळसा गावाला वळसा." आपल्या विसरभोळ्यापणामुळे किंवा नकळत केलेल्या दुर्लक्षाने आपल्यासोबत इतरांनाही त्रास होणार नाही याची खबरदारी बालपणापासूनच घेणे पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी पडते आणि म्हणूनच कुटुंबानेही ही जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली पाहिजे.
©️ वर्षा_शिदोरे
लेखिका: वर्षा शिदोरे
जिल्हा: नाशिक
मो. ८७९३७९९७७७