नारीजन्म शाप की वरदा
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
ओठी सुहास्य नयनी पाणी!
मानवाचे मूळ स्त्रीच्या उदरी अंकुरत असले तरी, त्याला जबाबदार पुरुषही असतो! तफावत असते ती केळ विचारांची. किंबहुना, पिढ्यानपिढ्या चालत आलेला दुय्यम दर्जा हेही एक कारण आहे. उत्तर भारतात काही प्रांतात मुलीचा जन्म शाप मानला जातो, त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होतात. तर दक्षिणेत केरळ प्रांतात स्त्रीप्रधान कुटुंबे नांदतात!
जिथेजिथे हुंडा प्रथा आहे तिथे स्त्रीजन्म शाप मानला जातो हे नक्की! तसेच शिक्षणाची पार्श्वभूमी जिथे मजबूत तिथे मुलगी झाली की मुलगा ही बाब गौण असते. बर्याच प्रांतात मुलीचा जन्म शुभ मानतात तर काही ठिकाणी अाजही मुलासाठी बर्याचवेळा स्त्रीला प्रसूतीला सामोरे जावे लागते किंवा संगनमताने पिंड पाडला जातो! विशेष म्हणजे या कार्यात महत्वाचा निर्णय घरातील जाणत्या स्त्रीयांचाच असतो, हे महादुर्दैव!
स्त्रीला निव्वळ उपभोग्य वस्तू आहे असे मानणे, हा अजून एक पूर्वापार चालत आलेला समज! यासाठी मी माझ्याच कुटुंबातील दोन घटना आज मुद्दाम इथे सांगत आहे. माझी आई, गोरी, सुंदर होती. परंतु, लग्नाच्या काही दिवस आधी तिला ताप अाला होता, नेमकी तिची दृष्टी अधू झाली! लग्न झाले, पण काही दिवसांनी तिच्या डोळ्यांचे अधूत्व नातेवाईकांच्या नजरेस पडले. काका, बाबांना म्हणाले, "दागिने काढून घे तिचे आणि माहेरी नेऊन सोड." पण बाबा म्हणाले, मी सप्तपदीची वचने पाळणार!" काकी म्हणाली, गोरीगोमटी, सुंंदरी आहे ना, म्हणून सोडवत नाही भावजींना!" तसेच, मला पहिली मुलगी झाली, तेव्हा तिचे फार कौतुक झाले, पण दुसर्या मुलीनंतर मी ताबडतोब माझ्या नवर्याच्या संमतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली, हे जेव्हा घरी सासूबाईंना कळले तेव्हा त्यांनी आकांडतांडव केले. अगदी मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न लावून देणार इतपत त्यांची मजल गेली होती, हे नंतर मला माझ्या वहिनीने सांगितले!
माझे आईबाबा दोघेही द्विपदवीधर, दोन मुलगे असताना मुलगी व्हावी म्हणून नवस केला होता! माझा जन्म सार्थकी लागला आणि सासूबाई अशिक्षीत, दुसर्या मुलीनंतर थांबले म्हणून गहजब झाल्यासारख्या वागल्या! विचारांची किती तफावत! परंतु, सुशिक्षित लोक जेव्हा हुंड्यासाठी बळी घेतात किंवा सूनेला आत्महत्येस प्रवृत्त करतात, तेव्हा मन विषण्ण होते, नारीजन्म शाप वाटू लागतो! न्यायालयात कार्यरत असल्यामुळे, अशा अनेक घटना रोज ऐकाव्या लागतात. अशिक्षीत आईबाप कमी शिकलेल्या मुली, निव्वळ पोटगीसाठी खेपा मारत रहातात! तेव्हा शाप वाटतो जन्म! बलात्कारपिडीतेला तिचे नातलग कोसतात, तेव्हा वाटतो नारीजन्म शाप!
निर्भया असो वा एसिड हल्लापिडीत लक्ष्मी अग्रवाल सारख्या अनेक मुली, जेव्हा पुरुषी नजरांना बळी पडतात, तेव्हा शाप वाटतो स्त्रीजन्म!
अनेक कर्तृत्ववान स्त्रीया होऊन गेल्या आणि आताही आहेत त्यांची असामान्य चरित्रे प्रेरणादायी आहेत! जीजामाता, लक्ष्मीबाईंपासून अंतराळाला गवसणी घालणारी कल्पना चावला वा किरण बेदी, मीराताई बोरवणकर या पोलीसदलातील दीपमाळांपर्यंत, याला म्हणतात स्त्रीजन्माचं सार्थक, वरदान! त्यांनी कष्टाने मारली ही मजल, सोपे खचितच नव्हते त्यांचे जिणे, पण करता यायला हवी परिस्थितीवर मात आणि मिळायला हवी कुटुंबाची साथ!
नारीजन्म वरदानच वाटतो मला, स्वनिर्मितीचे सुख हे परम सत्य! नारीमधे साक्षात दुर्गा वास करते! प्रत्यक्ष शिवाला अष्टसिद्धी प्राप्तीसाठी मदत करणारी सिद्धीदात्री होती, म्हणूनच शिवशक्तीचे अर्धनारीनटेश्वररुप दिसते! सृष्टीमाता, लक्ष्मीमाता, सरस्वती, प्रसंगी दुर्गा, चंडी, अनेकरुपी! भारतमातेला कसे विसरावे, जिथे जन्मलो, वाढलो, जगलो! गरज आहे नारीला आत्मभानाची, तिच्यातील शक्ती ओळखण्याची, तरच नारीजन्म शाप न रहाता वरदान होईल या आशावादानेच आवरता घेते लेख!
सरतेशेवटी, एक चारोळी हवीच!
नारीशक्ती सदा जाणवणारी
झुळूक शितल, सहचारिणी
कुटुंबाचा सांभाळ करणारी
भार्या, माता, कुलोद्धारिणी
सौ. प्रिया प्रकाश गावडे,
ठाणे.