रेवदंड्यात ‘बाबू’ संतोष मोरे यांची विजयी एंट्री; उपसरपंचपदावर महाविकास आघाडीची मोहोर
रेवदंडा (ओमकार नागावकर)
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संतोष उर्फ बाबू सदाशिव मोरे यांनी ९ विरुद्ध ७ मतांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला.
माजी उपसरपंच सौ. मंदा माणिक बळी यांचे अतिक्रमण प्रकरणामुळे तसेच सदस्यत्व रद्द झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संतोष मोरे आणि महायुतीकडून शिंदे गटाचे सुराराम मोहनलाल माळी यांच्यात थेट लढत झाली.
निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायतीतील संख्याबळ आणि स्थानिक पातळीवरील जनाधार पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
या विजयासाठी सुरेश खोत, अशोक नाईक, शरद वरसोलकर, शरद पाटील, जनार्दन कोंडे, संदीप विजय चौलकर, निलेश गाडे, निलेश खोत, प्रमोद नवखारकर (बाळू), मिलिंद चुनेकर, मिलिंद वाडकर, राहुल गणपत, संतोष जाधव, आशिष गोधळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.
या निकालामुळे रेवदंडा ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, आगामी स्थानिक राजकारणात या विजयाची चर्चा रंगू लागली आहे.