Home

शब्दांना लाभली प्रतिभेची किनार ; प्रथमेश कासार यांच्या काव्यसंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन

 शब्दांना लाभली प्रतिभेची किनार ; प्रथमेश कासार यांच्या काव्यसंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन


रायगड/मुरुड (ओमकार नागावकर) 

मुरूड येथील युवा कवी प्रथमेश कासार यांच्या ‘प्रतिभेच्या वाटेवर’ या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याने अलिबागमधील रायवाडी कॉम्प्लेक्स हॉल साहित्य, काव्य आणि सांस्कृतिक वातावरणाने भारावून गेला. साहित्यसंपदा प्रकाशनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील हे होते. व्यासपीठावर रायगड रत्न रमेश धनावडे, कोमसाप रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ तसेच साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संजय गुंजाळ यांनी प्रथमेश कासार यांच्या कवितांचे कौतुक करत, “प्रथमेश हा संवेदनशील आणि आशयघन लेखन करणारा कवी असून त्याच्या कविता थेट मनाला भिडतात,” असे मत व्यक्त केले. रायगड रत्न रमेश धनावडे आणि ॲड. जीविता पाटील यांनीही त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले.


प्रथमेश कासार यांचा विद्यार्थी तरण कवामपल्ली याने कवितांचे गायन सादर करत कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्याच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निकमध्ये यांत्रिकी विभागात व्याख्याते म्हणून कार्यरत असलेले प्रथमेश कासार तांत्रिक क्षेत्रासोबत कवितेसारख्या भावस्पर्शी क्षेत्रातही संवेदनशीलतेने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या कविता सहज, गेय आणि सामान्य रसिकांच्या मनाला भिडणाऱ्या असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर यांनी केले. यावेळी ॲड. जीविता पाटील, संध्या दिवकर, सिद्धेश लखमदे, लालसिंग वैराट, दीप्ती कुलकर्णी, दिलीप मोकल आणि मयूर पालकर यांनी काव्यरचना सादर करत साहित्यिक रंग भरले. कार्यक्रमास प्रथमेश कासार यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post