सबस्टेशन आणि पुलाच्या चुकीच्या कामामुळे भाकरवाड-देहेन गावावर महापुराचे संकट; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक”
“वारंवार निवेदन देऊनही प्रशासन झोपेत; १९८९ आणि २०१७ च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती”
अलिबाग (प्रतिनिधी)
अलिबाग तालुक्यातील भाकरवाड-देहेन परिसरात सुरू असलेल्या सबस्टेशन आणि पुलाच्या बांधकामामुळे भविष्यात मोठ्या महापुराचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. “गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे नियोजन सुरू असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सबस्टेशनचे काम गावकरी आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता थेट मुख्य पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या जागेवर सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या काळात भाकरवाड-देहेन मुख्य रस्त्यावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहत असते. मात्र आता सबस्टेशनमुळे हा पाण्याचा मार्ग अडवला जाणार असल्याने हे पाणी थेट गावातील सखल वस्तीत शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.
सन १९८९ मध्ये आलेल्या महापुरात गावातील घरांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर २०१७ मध्येही भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाईचे धनादेश देण्यात आले होते. तरीही आज त्याच धोकादायक परिस्थितीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकल्पामुळे भातशेती पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, शेततळ्यांमधील मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, देहेन गावातील मोडकळीस आलेल्या पुलाच्या नव्या बांधकामावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सागरगड माची परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने जुन्या पुलाला चार गाळे होते. मात्र नव्या पुलात केवळ दोनच गाळे ठेवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा निचरा अडून भविष्यात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाबाबत मा. ग्रामपंचायत सदस्य प्रीती प्रवीण पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील तसेच ग्रामस्थांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी आणि पोयनाड पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली होती. मात्र संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
देहेन-भाकरवाड रस्ता दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान अनेकदा पाण्याखाली जातो आणि गावांचा संपर्क तुटतो. तरीही प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास न करता कामे सुरू असल्याने भविष्यात मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचबरोबर कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना कंत्राटदारांकडून पोलिस संरक्षणाच्या आड दमदाटी केली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी न्यायप्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“आमचा विकासकामांना विरोध नाही, पण गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे नियोजन आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाण्याच्या निचऱ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा भविष्यात होणाऱ्या मनुष्यहानी आणि मोठ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.