उज्ज्वल माणुसकी आमदार चषक 2026 मध्ये वरसोली क्रिकेट क्लब विजेता
अलिबाग (वार्ताहर)
लोणारे-थळ : उज्ज्वल माणुसकी आमदार चषक 2026 ही लेदर ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा 9 मे पासून तलवार ग्राउंड, लोणारे-थळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आज झालेल्या अंतिम सामन्यात वरसोली क्रिकेट क्लब आणि पेण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यात रंगतदार व चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर वरसोली क्रिकेट क्लबने शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले.
या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुमित भगत याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मनीष पाटील, उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरव वडके, तर “मॅन ऑफ द सिरीज” पुरस्कार पेण संघाचा देवांश तांडेल याला प्रदान करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभासाठी अलिबाग तालुका क्रिकेट असो अध्यक्ष मा. प्रशांत नाईक, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध पाटील, सचिव श्री. प्रदीप नाईक, सहसचिव जयंत नाईक , रायगड प्रीमिअर लीग अध्यक्ष श्री. राजेश पाटील, संदेश गुंजाळ, पंचायत समिती सदस्य श्रीम. गुंजाळ, ऋषिकेश साखरकर, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, संदीप जोशी, शाम नाईक, विवेक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप नाईक यांनी लेदर क्रिकेट ग्रामीण भागात अधिक रुजण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच “उज्ज्वल माणुसकी”च्या माध्यमातून होत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
रायगड जिल्ह्यासाठी खोपोली येथे लवकरच आधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध पाटील यांनी दिली. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करत स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट झाल्याचे नमूद केले.
डॉ. राजाराम हुलवान यांनी कमी खर्चातही दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करता येतात, याचे उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिल्याचे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव यांनी सांगितले व सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयुष साखरकर यांनी सर्व मान्यवर, खेळाडू, ग्रामस्थ प्रेक्षक व उपस्थितांचे आभार मानत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.