Home

हिशोब जगण्यातले.... कवयित्री वर्षा शिदोरे


 हिशोब जगण्यातले…


होत असेल दुःखी मन कधी आनंदीदेखील 

पण डोळ्यातल्या पाण्याचे ओघळणे, कळेना 

होत असतील गोष्टी नकोशा कधी हव्याशा

पण तक्रार स्वतःशीच अशी, ते का कळेना…


होत असेल हळवे मन मायाळू कधी काटेरी 

पण श्वासाचे भल्या गर्दीत कोंडणे, कळेना 

होत असतील वेदना नकोशा काळजातल्या

नाते मनाचे चूक की अचूक, ते का कळेना…


होत असेल संवाद कधी नित्य वादविवाद 

पण आपुलकीचे विश्व साकारणे, कळेना 

होत असतील हृदयाचे भरकटणे अर्ध्यातले 

प्रवासाचे सोबत असणे-नसणे, ते का कळेना…


होत असेल वेडं मन शाब्दिक कधी अबोलही 

पण अव्यक्त विश्वासाचे गुदमरणे, कळेना 

होत असतील संघर्ष निरर्थक समजूतीतले 

क्षणिक क्षणांचे अपूर्ण गुपित, ते का कळेना…


होत असेल भावनाशून्य सोबत कधी एकोपा 

पण अस्तित्वाचे सतत कुरवाळणे, कळेना

होत असतील आठवणी आवडत्या, नावडत्या

जगण्यातले हेच शुल्लक हिशोब, ते का कळेना… 


 वर्षा_शिदोरे

मो. ८७९३७९९७७७

Previous Post Next Post