चित्रपट पत्रकारितेचा चालता-बोलता इतिहास विद्यार्थ्यांसमोर; ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
अलिबाग : चित्रपटसृष्टीतील चार दशकांहून अधिक काळाचा समृद्ध अनुभव, हजारो कलाकार-तंत्रज्ञांशी साधलेला थेट संवाद, पडद्यामागील असंख्य आठवणी, चित्रपट पत्रकारितेतील संघर्ष, सातत्य आणि यशाचा प्रवास यांची जिवंत अनुभूती विद्यार्थ्यांना देत ज्येष्ठ चित्रपट पत्रकार, लेखक आणि टीव्ही विश्लेषक दिलीप अनंत ठाकूर यांनी स्वयं शैक्षणिक संस्थेच्या पत्रकार प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रपट पत्रकारितेची सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने पत्रकार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण प्रमुख ओमकार नागावकर यांनी दिलीप ठाकूर यांना विशेष निमंत्रण दिले होते. दि. १४ जून रोजी अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या विशेष संवाद आणि मार्गदर्शन कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चार दशकांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा आढावा घेताना दिलीप ठाकूर यांनी नवशक्ती दैनिकातील सुरुवातीच्या दिवसांपासून ते मुद्रित माध्यम, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. चित्रपट पत्रकारिता म्हणजे केवळ कलाकारांच्या मुलाखती किंवा चित्रपट परीक्षण नसून, त्यामागे सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधन, निरीक्षणशक्ती, विश्वासार्ह स्रोत आणि प्रचंड मेहनत आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपट कसा तयार होतो, त्याचे समीक्षण कसे करावे, मनोरंजन पत्रकारितेतील नैतिक मूल्ये कोणती, ग्रामीण भागातील पत्रकारांनी या क्षेत्रात काम करताना कोणती काळजी घ्यावी," यासह अनेक विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. पडद्यावरील कलाकार आणि पडद्यामागील कलाकार यांच्यातील वास्तव, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, चित्रपट वितरण आणि प्रदर्शन व्यवस्थेतील बदल याबाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी २६ वर्षा पूर्वीची आणि त्यानंतरची बदललेली चित्रपटसृष्टी, सिंगल स्क्रीन थिएटरपासून मल्टिप्लेक्स संस्कृतीपर्यंतचा प्रवास, तसेच ‘शोले’ ते ‘धुरंधर’ या कालखंडातील चित्रपटांचा बदलता चेहरा यावर त्यांनी अत्यंत रंजक शैलीत भाष्य केले. त्यांच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीतील अनेक अज्ञात पैलू समजले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी चित्रपट, पत्रकारिता, लेखन, समीक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील करिअरविषयी विविध प्रश्न विचारले. दिलीप ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत, उदाहरणांसह आणि अनेक आठवणी सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामुळे हे सत्र केवळ मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता अनुभवांचा खजिना ठरले.
या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, वेदभूमी न्यूज संपादक जान्हवी भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वयं शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण प्रमुख ओमकार नागावकर यांनी दिलीप ठाकूर यांची विशेष मुलाखत घेत त्यांच्या पत्रकारितेतील प्रवास, चित्रपटसृष्टीतील अनुभव आणि भविष्यातील पत्रकारांसाठीचे संदेश जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी प्रकाश पाटील यांनी दिलीप ठाकूर यांचे आभार मानत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणे ही मोठी संधी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनीही ठाकूर यांच्या अनुभवसमृद्ध आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे पत्रकारितेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याची भावना व्यक्त केली.
"चार दशकांचा अनुभव, हजारो आठवणी आणि पत्रकारितेचा अमूल्य वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम ज्ञान, प्रेरणा आणि अनुभव यांचा अनोखा संगम ठरला."