निसर्गाच्या सान्निध्यात रमल्या मंत्री आदिती तटकरे पक्षीनिरीक्षण व जंगलभ्रमंती
पाली (अमित गवळे)
पाली, ता. 14 (वार्ताहर) महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या व्यस्त राजकीय व प्रशासकीय वेळापत्रकातून काही निवांत क्षण काढत निसर्गाच्या सान्निध्यात घालवले. शनिवारी (ता. 13) त्यांनी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील निसर्गरम्य वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांच्यासोबत जंगलभ्रमंती करत पक्षीनिरीक्षणाचा मनमुराद आनंद लुटला.
या जंगलभ्रमंती दरम्यान आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील जंगलांचे वैभव असलेल्या 'महाधनेश' (ग्रेट हॉर्नबिल) पक्ष्याविषयी सविस्तर माहिती घेतली. महाधनेश पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनचक्र, प्रजननकाळ आणि रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी शंतनु कुवेसकर यांच्याकडून अत्यंत उत्सुकतेने जाणून घेतले. या निसर्गभ्रमंती दरम्यान त्यांनी नवरंग, काळटोप हळद्या, पाचू कवडा, मधुबाज, शमा आणि गव्हाणी घुबड अशा विविध रंगीबेरंगी व दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण केले आणि त्यांचे विहंगम क्षण कॅमेऱ्यात टिपले.
सकाळची निसर्गभ्रमंती आटोपून परतत असताना, आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील कुवेसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. व मनमोकळ्या गप्पा रंगल्या. निसर्गात फिरताना मिळणारा असीम आनंद, बालपणीच्या रम्य आठवणी, आजोळी मिळालेले प्रेम, गोठ्यातील गाई-वासरांचे हंबरणे आणि जुने दिवस याबद्दल त्यांनी आपल्या भावना प्रेमाने व्यक्त केल्या. या प्रसंगी बोलताना त्यांनी देव, निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नातेसंबंधांवरही प्रकाश टाकला. निसर्गाशी जोडले गेल्यावर मनाला मिळणारी आंतरिक शांतता आणि ईश्वराशी निर्माण होणारे अंतर्मनाचे नाते याविषयी त्यांनी आपले विचार मांडले.
राजकारणाचा मोठा वारसा लाभलेला असतानाही, केवळ स्वकर्तृत्व, सामाजिक जाणीव आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाच्या बळावर आपले नेतृत्व सिद्ध करणाऱ्या आदिती तटकरे यांच्या मधील एक संवेदनशील, निसर्गप्रेमी आणि अध्यात्मिक पैलू या भेटीच्या निमित्ताने सर्वांना अनुभवता आला. ही भेट कुवेसकर कुटुंबासाठी कायम स्मरणात राहणारी आणि अत्यंत आनंददायी ठरल्याचे कुवेसकर कुटुंबीयांनी सांगितले.
जीवनात इतरत्र आनंदाचा, सुखाचा शोध घेत असताना अनेकदा निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेल्या आनंदाचा, सौंदर्याचा उपभोग आपण घेत नाही. रायगड जिल्ह्याला हे निसर्गदत्त सौंदर्य भरभरून लाभले आहे. आपण सर्वांनी हे सौंदर्य डोळ्यात, मनात साठवण्यासाठी रायगड जिल्ह्याला भेट द्यावी, इथल्या पर्यटनाचा आनंद घ्यावा" असे आवाहन आदिती वरदा सुनील तटकरे यांनी केले.