कार्ले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, वर्षाची घरपट्टी मी भरणार; उपसरपंच राकेश पाटील यांची अभिनव घोषणा
अलिबाग (विशेष प्रतिनिधी) :
ग्रामीण भागातील शासकीय शाळांचा दर्जा सुधारावा आणि पटसंख्या वाढावी, यासाठी मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश पाटील यांनी एक अत्यंत कौतुकास्पद आणि अनोखा निर्णय घेतला आहे. "जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश कार्ले येथील जिल्हा परिषद शाळेत घेतील, त्या पालकांची या वर्षाची संपूर्ण घरपट्टी मी स्वतः स्वखर्चाने भरणार आहे," अशी जाहीर घोषणा उपसरपंच राकेश पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या अनोख्या आवाहनामुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवणे आणि पालकांचा ओढा पुन्हा सरकारी शाळांकडे वाढवणे, या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या संदर्भातील त्यांची एक फेसबुक रील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शाळोपयोगी साहित्यही मोफत देणार
केवळ घरपट्टी भरणार एवढ्यावरच न थांबता, उपसरपंच राकेश पाटील यांनी पालकांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कार्ले जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात लागणारे संपूर्ण शाळोपयोगी साहित्य (वही, दप्तर, पाट्या व इतर शैक्षणिक साहित्य) देखील ते स्वतःच्या खर्चाने मोफत उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे गरीब आणि गरजू पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी पाऊल
आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना पटसंख्ये अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या गावातील हक्काची सरकारी शाळा टिकली पाहिजे आणि गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, या भावनेतून एका लोकप्रतिनिधीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.
"आपल्या जिल्हा परिषद शाळा ही आपल्या गावाचे वैभव आहेत. या शाळांमध्ये उत्तम शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण मिळते. पालकांनी खाजगी शाळांच्या अवाजवी खर्चाला बळी न पडता आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा. पालकांवरील आर्थिक भार हलका करण्यासाठी मी या वर्षाची घरपट्टी आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च स्वतः उचलण्यास तयार आहे."
— राकेश पाटील (उपसरपंच, मान तर्फे झिराड)
राकेश पाटील यांच्या या थेट आणि आश्वासक आवाहनामुळे आता कार्ले जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे असून, इतर गावांसाठीही हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.