Home

"आश्वासनांचा पूल मजबूत, पण पाले पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर!"

 "आश्वासनांचा पूल मजबूत, पण पाले पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर!"


अलिबाग (ओमकार नागावकर) 

पाले पुलावरील संरक्षण कठडा पूर्णपणे कोसळल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी हा अपघात भविष्यातील भीषण दुर्घटनेचा स्पष्ट इशारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागाव ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

"आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?" असा संतप्त सवाल उपस्थित करत सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीने पाले पुलाची धोकादायक अवस्था वारंवार निदर्शनास आणून देत PWD विभाग, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अनेक पत्रे पाठवली. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांची खैरात झाली, तर प्रत्यक्षात फक्त तात्पुरत्या डागडुजीवरच वेळ मारून नेण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील पूल दुर्घटना आणि महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून अनेक निष्पाप जीव गेलेली घटना अद्याप जनतेच्या स्मरणात ताजी आहे. तरीही प्रशासनाने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नसल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, बेली पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे जड वाहतूक सध्या पाले पुलावरून सुरू आहे. अशा परिस्थितीत संरक्षण कठडा कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

घटना घडताच सरपंच सौ. मयेकर यांनी तातडीने PWD अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित तात्पुरती दुरुस्ती सुरू केली. मात्र "तात्पुरत्या मलमपट्टीने प्रश्न सुटणार नाही; आता कायमस्वरूपी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घ्यावाच लागेल," अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.

दरम्यान, नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने PWD विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक होणार असून, नवीन पाले पुलाच्या उभारणीसाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली जाणार आहे.

"आता आश्वासनं नकोत... निर्णय हवा! कारण पूल कोसळल्यानंतर चौकशा होतात, पण गेलेले जीव कधीच परत येत नाहीत," असा इशारा देत ग्रामपंचायतीने प्रशासनाला तातडीने जागे होण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post Next Post