वटपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत,
होते वृक्षांचे जतन,
निसर्गत: दीर्घायुषी,
वड, पिंपळ पूजन!
पावसाच्या सरींसवे,
वट पौर्णिमा ज्येष्ठात,
प्राणवायू मिळे स्त्रीस,
पौराणिक कथा ज्ञात!
सत्यवान पुण्यशील,
सती सावित्री महान,
यमा घालून साकडे,
सौभाग्याचे मागे दान!
कुंकू, वेणी, नऊवारी,
नथ, नाकात साजरी,
कंकणांची किणकिण,
सया, आल्या पारावरी!
वटपूजा, मनोभावे,
संकल्पाने, उपवास,
धूप, दीप, ओवाळीते,
पंचामृत, नैवेद्यास!
सात फेरे, घेई नारी,
वटवृक्षां बांधे धागे,
दीर्घायुषी होवो, पती,
सात जन्मासाठी मागे!
सौ. प्रिया प्रकाश गावडे,
ठाणे.