Home

लाडकी बहीण योजनेवर कॅगचे ताशेरे; पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी सरकारचा प्रस्ताव

 लाडकी बहीण योजनेवर कॅगचे ताशेरे; पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी सरकारचा प्रस्ताव

मुंबई (प्रतिनिधी)

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खर्च आणि लाभार्थी पडताळणीवर नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांनी ताशेरे ओढल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी सरकार प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

राज्य सरकारने 28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. मात्र, नंतरच्या पडताळणीत काही पुरुष आणि काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.

पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसुलीचा प्रस्ताव

आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून पैसे परत घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

शासकीय कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी चुकीने लाभ घेतल्याच्या प्रकरणांमध्येही रक्कम परत घेण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही रक्कम ट्रेझरीकडे जमा होत असून ती थेट विभागाकडे परत जमा होत नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी

सरकारच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 67 लाख आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, मुदतवाढ देऊनही जवळपास 62 लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

तपासणीत पुढील अपात्र लाभार्थी आढळल्याचे सांगण्यात आले आहे:

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सुमारे 16 लाख लाभार्थी अपात्र ठरले.

कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या सुमारे 4.42 लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 3.6 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतल्याचे आढळले.

एकाच कुटुंबातून दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी लाभ घेतल्याची सुमारे 2.5 लाख प्रकरणे समोर आली.

कॅगच्या निरीक्षणांनंतर सरकार सतर्क

कॅगच्या निरीक्षणांनंतर सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाची कल्याणकारी योजना मानली जाते. त्यामुळे या योजनेतील अपात्र लाभार्थी आणि खर्चाबाबत पुढे सरकार कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


Previous Post Next Post