Home

महाकवी कालिदासांच्या काव्यवैभवापासून बोरकरांच्या निसर्गकाव्यापर्यंत : ३०वे कविसंमेलन साहित्यरसिकांच्या मनात उमटवून गेले अमिट ठसा

 महाकवी कालिदासांच्या काव्यवैभवापासून बोरकरांच्या निसर्गकाव्यापर्यंत : ३०वे कविसंमेलन साहित्यरसिकांच्या मनात उमटवून गेले अमिट ठसा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) 

 “कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती अंतर्मनाचा संवाद, समाजाशी असलेले नाते आणि काळाशी साधलेला संवेदनशील स्पर्श असतो,” या भावनेला केंद्रस्थानी ठेवत मराठी साहित्य व कला सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ३०वे कविसंमेलन रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीतील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण, साहित्यनिष्ठ आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या साहित्यसोहळ्यात कविता, अभिवाचन आणि साहित्यचिंतन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी, कवी–रसिक संवाद अधिक व्यापक करण्यासाठी आणि सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेल्या मराठी साहित्य व कला सेवा संस्थेच्या या उपक्रमाने ३०व्या टप्प्यावर पोहोचताना साहित्यप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रात “मुक्त विषय” अंतर्गत सहभागी कवींनी जीवनानुभव, सामाजिक वास्तव, निसर्ग, प्रेम, मानवी नाती आणि समकालीन विषयांवर आधारित स्वरचित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. विविध भावछटांनी नटलेल्या या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. दुसऱ्या सत्रात “महाकवी कालिदास” या विषयावर आधारित काव्यसादरीकरण झाले. भारतीय काव्यपरंपरेतील अजरामर व्यक्तिमत्त्व असलेल्या महाकवी कालिदास यांच्या साहित्यवैभवातून प्रेरणा घेत कवींनी निसर्ग, सौंदर्य, प्रेम आणि मानवी भावविश्वाचे विविध पैलू आपल्या कवितांमधून मांडले. कालिदासांच्या काव्यदृष्टीचा प्रभाव या सत्रातून अनुभवायला मिळाला.

तिसऱ्या सत्रात कवी बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे अभिवाचन करण्यात आले. निसर्ग, प्रेम, अध्यात्म आणि मानवी संवेदनांनी समृद्ध असलेल्या बोरकरांच्या कवितांचे भावपूर्ण अभिवाचन रसिकांच्या मनाला स्पर्शून गेले. शब्दसंगीत आणि भावविश्वाने भारलेल्या या सत्रामुळे संपूर्ण कविसंमेलनाला वेगळीच साहित्यिक उंची प्राप्त झाली. या कविसंमेलनात बालकवयित्री अजया, अर्चना देशपांडे जोशी, सरोज सुरेश गाजरे, कृपा राकेश म्हात्रे, जान्हवी शिराळकर, डॉ. अर्चना येंदारकर, डॉ. मानसी पाटील, प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर, प्रिया प्रमोद दामले, हर्षिता बेंद्रे, मयूर पालकर, मीनल शेकटकर कांबळे, वनिता सचिन साळुंखे, विवेक वसंत जोशी, सीमा खान शेख, सुनंदा रामचंद्र गिरी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या प्रभावी काव्यसादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.

कवितांच्या आस्वादासाठी अजिता अजित मुळीक, अरविंद शिराळकर आणि श्रावणी ओमकार जोशी यांनी उपस्थित राहून कवींच्या सादरीकरणाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या संवेदनशील उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी पाटील यांनी संयत, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत केले. अल्पोपहाराची व्यवस्था डॉ. मानसी पाटील यांनी समर्थपणे सांभाळली. समारोपप्रसंगी आयोजक गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी सहभागी कवी, आस्वादक आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. कविता, साहित्यपरंपरा आणि वैचारिक देवाणघेवाण यांचा उत्सव म्हणून हे कविसंमेलन संस्मरणीय ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महाकवी कालिदासांच्या अभिजात साहित्यपरंपरेपासून बा. भ. बोरकरांच्या भावसमृद्ध काव्यविश्वापर्यंतचा साहित्यिक प्रवास घडवणारे हे कविसंमेलन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मराठी साहित्य व कला सेवा आयोजित पुढील कविसंमेलन रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Previous Post Next Post