माधवबाग खोपोलीत ज्येष्ठांना मिळाला आरोग्याचा नवा मंत्र
अलिबाग (ओमकार नागावकर)
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रेवदंडा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी माधवबाग, खोपोली येथे विशेष आरोग्य सहलीचे आयोजन करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात आयोजित या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी, योग मार्गदर्शन आणि देवदर्शनाचा लाभ एकाच वेळी मिळाला.
ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध आरोग्य समस्यांचा विचार करून माधवबाग खोपोलीचे हेल्थ एक्झिक्युटिव्ह तुषार पाटील यांनी अत्यंत माफक दरात बीपी, वजन, उंची, ईसीजी, शुगर आदी तपासण्यांचे विशेष पॅकेज उपलब्ध करून दिले. यावेळी ४७ ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमादरम्यान योग प्रशिक्षक अरुण जाधव यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करत ज्येष्ठांना नियमित व्यायाम आणि योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन आणि आरोग्य सल्लाही देण्यात आला. सहभागींसाठी मोफत नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
माधवबागच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आत्मीय विचारपूस आणि विनम्र सेवा ज्येष्ठांसाठी विशेष आनंददायी ठरली. परतीच्या प्रवासात महड येथील अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणपती तसेच गगनगिरी महाराजांच्या स्थळाचे दर्शन घेतल्याने सहलीला अध्यात्माचीही जोड मिळाली.
आरोग्य तपासणी, योग मार्गदर्शन, वर्षासहल आणि देवदर्शन अशा विविध अनुभवांनी समृद्ध झालेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते.