‘लाखाची कमाई’ करणाऱ्या अलिबाग-शेगाव बसच्या चालक-वाहकांचा गौरव
अलिबाग (ओमकार नागावकर)
अलिबाग आगारातून धावणाऱ्या अलिबाग-शेगाव बससेवेने महसुलाचा नवा टप्पा गाठत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १५ जून रोजी झालेल्या एका फेरीत या बसने तब्बल १ लाख १ हजार ४६२ रुपयांचा महसूल मिळवला. या यशामागे चालक सचिन बावस्कर आणि वाहक संदीप गोसावी यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले.
या फेरीत बसचे १०७.८८ टक्के भारमान नोंदविण्यात आले. प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारीने केलेली सेवा यामुळे हा विक्रम शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रायगड एसटी प्रेमी संघटनेच्या वतीने चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला. एसटीच्या उत्पन्नवाढीत आणि प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देण्यात त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कार कार्यक्रमाला अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांच्यासह रायगड एसटी प्रेमी संघटनेचे पदाधिकारी अमित कंटक, स्वप्नील भगत, संकेत पाटील आणि समीर रांजणकर उपस्थित होते. तसेच आगारातील कर्मचारी संदीप असलकर आणि रितेश पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली.
एसटी सेवेच्या बळकटीकरणासाठी चालक-वाहकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, अशा यशस्वी कामगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने महसूल आणि प्रवासीसंख्या या दोन्ही बाबतीत हा मार्ग विशेष ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
ठळक बाबी
• महसूल : ₹१,०१,४६२
• भारमान : १०७.८८ टक्के
• चालक : सचिन बावस्कर
• वाहक : संदीप गोसावी
• रायगड एसटी प्रेमी संघटनेकडून सत्कार
• अलिबाग आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित