Home

विषारी दारूचे बळी वाढताहेत..लेखक लीलाधर दवंडे

 विषारी दारूचे बळी वाढताहेत 


नुकतेच मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी पुणे चिंचवड मधील फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महसूल उत्पन्नाला हपापलेल्या राज्य सरकारला यामुळे काहीसे हादरे मिळाले. दारूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा हा आकडा कदाचित पुढेही जाऊ शकतो. त्यानंतर लगेच हडपसर येथेही विषारी दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि सुस्त झालेली शासकीय यंत्रणा पुन्हा कामाला लागली. 

कुठे काही दुर्घटना झाली की लगेच त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत जाहीर करून आपली जबाबदारी झटकणारे शासन याहीवेळी मृतकांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करून मोकळे झाले. हा पायंडा पाडल्याने यापुढे प्रत्येक राज्य अशा दारूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वारसांना पैसे देतील, यात नवल नाही. म्हणजे प्या...मरा आणि घरच्यांना सुखी करा असेच म्हणावे लागेल. पुण्यातील या विषारी दारू प्रकरणी काही लोकांना आता अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. वास्तविक या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यात कोण कोण सहभागी आहे, याचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे कमप्राप्त आहे. पण, नेहमीप्रमाणे संथगतीने चालणारा तपास आरोपींना जामीन मिळवून देण्यास सहाय्यक ठरेल. पुन्हा आरोपी बाहेर येऊन आपली मृत्यूची दुकाने थाटण्यास सज्ज होतील आणि पुन्हा कुठल्या ठिकाणी विषारी दारू पिऊन नवे मृत्यू होतील. पुन्हा शासकीय मदत जाहीर केल्या जाईल. हे असेच चालणार. वास्तविक दारू पिणाऱ्यांच्या कुटुंबाची काय अवस्था असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण, दारू पिऊन मरणाऱ्यांना शासकीय मदत देण्यापेक्षा आणि सरकारी तिजोरी अशी खाली करण्यापेक्षा दारूची अवैध दुकाने, हातभट्टी, दारूच्या कंपन्याच बंद करणे योग्य नाही राहणार काय? दारूतून महसूल मिळतो आणि प्रसंगी निवडणूक सुद्धा जिंकता येते हे बरोबर असले तरी, या दारूमुळे विविध आजार झाल्यावर शासकीय रुग्णालयांत यांच्यावर उपचारासाठी सरकार अवाढव्य खर्च करते. मग, कुठले आले उत्पन्न? या दारू कंपन्या बंद करायच्या नाहीत ही सरकारची मानसिकता आहे की राजकीय लोकांच्याच दारूच्या कंपन्या आहेत? हा घोळ सर्वसामान्य माणसाला मात्र सोडवता येणारा नाही. आता पुन्हा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येथे सुद्धा विषारी दारू प्यायल्याने तीन जणांची प्रकृती बिघडली असल्याची घटना उघडकीस आली आहे. २०२३ च्या मे महिन्यात तामिळनाडू राज्यात सुद्धा अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूच्या विल्लुपरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात विषारी दारूने १० जणांचा बळी घेतला होता. त्यात महिलांचाही सहभाग होता. त्याच तामिळनाडू राज्यात २०२४ च्या जूनमध्ये विषारी दारूमुळे पुन्हा ३४ जणांचा मृत्यू झाला होता. कल्लाकुरीची येथे ही घटना घडली होती. आता मात्र तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील ७१७ सरकारी किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश देऊन, काही प्रमाणात मद्य विक्रीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आहे. छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात विषारी दारूमुळे सात जणांचा झालेला मृत्यूही असाच. अशा काही घटना घडल्या की त्याचं खापर अपुऱ्या पोलिस बळावर फोडले जाते. मात्र, दारू बनविणाऱ्या कंपन्या आम्ही रोजगार देतो म्हणून सर्रास आपले उत्पादन सुरू ठेवतात. याच कंपन्यांनी फळांचा शुद्ध रस, दुग्धजन्य पदार्थ बनविण्याच्या कंपन्या टाकून रोजगार दिल्यास योग्य नाही राहणार काय? पण, आम्हाला विषातून, लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून पैसा कमवायचा असतो, ही बाब या कंपन्या आणि सरकार सुद्धा दडवून ठेवते, असे खेदाने म्हणावे लागते. 

नुसत्या नागपूरचाच विचार करतो म्हटले तर जानेवारी २०२५ मधील एका रिपोर्टनुसार नागपूरकर २ कोटी ८ लाख रुपयांची तब्बल १,६२,२८० लिटर दारू दिवसाला रिचवतात. ही आकडेवारी डोळे दिपवणारी असली तरी, यात सत्यता आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीत देशी दारूचे प्रमाण ७३,७०४ लिटर इतके आहे आणि ही देशी दारू रिचविणारे गरीब कुटुंबातील असते ( रिक्षा चालक, मजूर वगैरे ) हे नव्याने सांगणे नाही. सरासरी काढतो म्हटले तर राज्यात दररोज ३० लाख लिटर दारूचा महापूर वाहतो, असेच म्हटल्या जाऊ शकते. जर, राज्यात दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असेल तर याच्या दुष्परिणामांनी मरणाऱ्यांवर किंवा विविध आजार ( यकृताचे आजार, कर्करोग आदी ) लागण ( झाल्यानंतर, अपघात घडल्यावर सरकार अशांवर किती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असेल, याची आकडेवारी मात्र कधीच पुढे येत नाही. खुद्द २०२४ च्या लोकसभा निवडणुक वर्षात महाराष्ट्रातील लाखो मद्यपींनी तब्बल ७२ कोटी ७० लाख लिटर देशी- विदेशी मद्य आणि बियर रिचवल्याची आकडेवारी समोर आली होती. 

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार जगात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ४.७ टक्के मृत्यू हे दारूमुळे होतात. दारूचे व्यसन दरवर्षी २६ लाख लोकांना मृत्यूच्या खाईत लोटते, असे यात म्हटल्या गेले आहे. २०१५ मध्ये राज्यातील मालाड मालवणी परिसरात नित्कृष्ट दर्जाची दारू प्यायल्याने तब्बल १०६ जणांचा मृत्यू झाला होता तर काहींना अंधत्व आले होते. या घटनेतून बोध घेऊन राज्यात सरसकट दारूबंदी झाली असती तर फुगेवाडीची घटना घडलीच नसती. मात्र, उत्पादन शुल्कातून पैसा कमविणाऱ्या सरकारला लोकांच्या जीवाचे काय मोल? २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात बिहारच्या १६ गावांमध्ये विषारी दारूमुळे ४१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना जनमनाला विचलित करणारी होती. त्याचीच पुनरावृत्ती पुढे २०२६ च्या एप्रिल महिन्यात होऊन बिहारच्या चंपारण जिल्ह्यात या विषारी दारूने ४ जणांचा बळी घेतला होता. तर, मोतीहारी जिल्ह्यात ११ जणांचा बळी याच महिन्यात घेतला होता. मात्र, इतर घटनांसारखी ही घटनाही सर्वांच्या आठवणींतून हद्दपार झाली आणि पुन्हा पुन्हा दारू पिऊन मरणाऱ्यांच्या घटना घडायला लागल्या. 

हल्ली स्टेट्स सिम्बॉल समजल्या जाणाऱ्या मद्यपानाचा संबंध मानवी शरीरातील तब्बल ६२ आजारांशी जुळला असल्याचे ॲडीक्शन या वैद्यकीय नियतकालिकात सादर झालेल्या शोधनिबंधात म्हटल्या गेले आहे. 

असे असतांना जाणीवपूर्वक जर काही लोकं मद्यपानाकडे वळून आपला जीव गमावत असेल तर, पर्याय नाही. मात्र, संतांच्या भूमीत वाढते मद्यपी आणि त्यातून मरणाऱ्यांची वाढती संख्या खरेच चिंताजनक आहे.


लीलाधर दवंडे 

कामठी (नागपूर)

८४१२८७७२२०

Previous Post Next Post