अकरावी प्रवेशाची तिसरी अलॉटमेंट यादी आज; 25 जूनपर्यंत प्रवेशाची मुदत
मुंबई (प्रतिनिधी)
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या FYJC (अकरावी) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीची महाविद्यालय अलॉटमेंट यादी आज, मंगळवार (23 जून) रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली.
राज्यातील 9,669 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत 14 लाख 37 हजार 656 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तिसऱ्या नियमित फेरीसाठी प्रवेश अर्ज भरणे आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची अंतिम मुदत 20 जून होती. या कालावधीत 5 लाख 64 हजार 300 विद्यार्थ्यांनी अर्ज आणि पसंतीक्रम सादर केले आहेत.
*अलॉटमेंटनंतर प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा*
तिसऱ्या फेरीत महाविद्यालय वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात 23 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 25 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निर्धारित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
*FYJC Admission 2026: महत्त्वाची माहिती*
▪️अलॉटमेंट यादी जाहीर: 23 जून 2026, सकाळी 10 वाजता
▪️प्रवेश निश्चित करण्याची मुदत: 23 जून दुपारी 12 ते 25 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत
▪️राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये: 9,669
▪️एकूण नोंदणीकृत विद्यार्थी: 14,37,656
▪️तिसऱ्या फेरीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी: 5,64,300
तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.