Home

बेपत्ता मुलीच्या नावाने बनावट अपहरण व्हिडिओ; वडिलांची 15 हजारांची फसवणूक

  बेपत्ता मुलीच्या नावाने बनावट अपहरण व्हिडिओ; वडिलांची 15 हजारांची फसवणूक

पुणे(प्रतिनिधी)

पुण्यातील कोंढवा परिसरात बेपत्ता झालेल्या एका 17 वर्षीय मुलीच्या प्रकरणात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा शोध सुरू असतानाच अज्ञात व्यक्तींनी तिच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून अपहरण झाल्याचा बनाव करत 15 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी केवळ 17 तासांत मुलीचा शोध घेऊन तिला झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्थानकातून सुखरूप ताब्यात घेतले.

व्हिडिओ कॉल करून अपहरणाचा बनाव

कोंढव्यात राहणारी 17 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असतानाच वडिलांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. या कॉलमध्ये मुलगी अपहरण केल्याचा दावा करण्यात आला आणि व्हिडिओमध्ये तिचे हातपाय बांधलेले असल्याचे दाखवून 50 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. घाबरलेल्या वडिलांनी मुलीच्या सुरक्षिततेच्या भीतीने तीन हप्त्यांमध्ये 15 हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवले.

17 तासांत पोलिसांची मोठी कामगिरी

पोलिसांनी तपास सुरू ठेवत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. पुणे रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये मुलगी हावडा जाणाऱ्या रेल्वेत बसल्याचे दिसून आले. यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारखंडमधील टाटानगर स्थानकावर मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

सोशल मीडियाचा गैरवापर करून बनावट व्हिडिओ

तपासात समोर आले की, मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते. याच माहितीचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी बनावट अपहरण व्हिडिओ तयार केला आणि कुटुंबाची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या बनावट कॉल्स आणि मेसेजेसबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


Previous Post Next Post