दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा शेकापचा एल्गार!
जंतर-मंतरवरील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही; युवकांच्या समर्थनार्थ PNP नाट्यगृहात हजारोंचा जनसागर
अलिबाग (ओमकार नागावकर)
दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा आणि आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आलेल्या दडपशाहीच्या कारवाईचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि युवकांच्या समर्थनार्थ शेकापच्या वतीने आज २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता PNP नाट्यगृह येथे महत्त्वपूर्ण निषेध सभा आयोजित करण्यात आली.
या सभेला युवक, विद्यार्थी, पालक, शेकापचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आपला संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा आवाज दडपून, लाठीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थेविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“विद्यार्थ्यांच्या आवाजावर लाठी चालवून प्रश्न सुटणार नाहीत; तरुणांच्या हक्कांसाठीचा संघर्ष आता अधिक तीव्र होईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. युवकांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत शेकाप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, परेश देशमुख यांच्यासह पालक, विद्यार्थी, युवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांवरचा अन्याय आणि तरुणांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. युवकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठीचा हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.