Home

शब्दांचा लपंडाव... कवयित्री प्रा.राजश्री पाटील

 शब्दांचा लपंडाव


भावनांचे तरंग उमटतात

पण कागद कोराच राहतो

​मनात विचारांचे काहूर

शब्दांची मात्र टाळाटाळ

​जणू एखादी नखरेल सुंदरी

रुसून कोपऱ्यात बसलीये

​कल्पनेचे पंख फडफडतात

लेखणी मात्र स्तब्ध आहे

​शब्दांची ही गूढ कोडी

मलाच कधी उलगडत नाहीत

​मनात भावनेचा अथांग सागर

काठ मात्र कोरडेपाषाण

​कधी शब्दांची होते बरसात

कधी कोरडा दुष्काळ उन्हाचा

​आजकाल माझीच कविता

माझ्याशीच लपंडाव खेळते

​भूतकाळाच्या स्मृती जाग्या

वर्तमान मात्र मुका झालाय

​अक्षरांचे हे नाजूक विणकर

आज मध्येच तुटून गेले

​कुठे विरून जातात शब्द

याचे कोडे सुटत नाही

​जणू काही माझी कविता

माझ्यावरच अबोला धरून बसलीये

​तिचा हा अबोला मला

आतल्या आत पोखरतो आहे

​आज तिचा रुसवा काढायला

मी पुन्हा लेखणी सरसावली

​ती मंद हसून म्हणाली

तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच काय....


प्रा.राजश्री पाटील

         सुरत

Previous Post Next Post