मातीखालून उलगडला १७०२ चा इतिहास
शिरवलीतील शिवकालीन बारवेला “श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान”ने दिला नवा श्वास; संवर्धन मोहिमेत सापडला दुर्मिळ शिलालेख
खोपोली (देवेंद्र येशीकर)
"आमचं ईमान सदैव शिव-शंभूंच्या चरणी" हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान परिवाराने रायगड जिल्ह्यातील आणखी एक ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्यापासून वाचवला आहे. खोपोली-पेण मार्गावरील शिरवली गावातील मातीखाली गाडली गेलेली शिवकालीन बारव शोधून तिचे संवर्धन करण्यात आले असून, या मोहिमेदरम्यान तब्बल १७०२ सालातील दुर्मिळ शिलालेख सापडल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील १० वी बारव संवर्धन मोहीम म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात प्रतिष्ठानच्या ५५ ते ६० सदस्यांनी श्रमदान करत बारवेला नवजीवन दिले. ही बारव पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. वेळेत संवर्धन झाले नसते, तर हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट झाला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
*शिलालेखातून उलगडला शाहू महाराजांच्या काळाचा इतिहास*
संवर्धन मोहिमेदरम्यान बारवमध्ये सापडलेल्या शिलालेखाची पाहणी इतिहास अभ्यासकांनी केली असता, संस्कृत-मराठी मिश्रित देवनागरी लिपीतील हा शिलालेख १७०२ सालातील असल्याचे स्पष्ट झाले.
हा बारव स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज (दुसरे) यांच्या काळात बांधण्यात आला असून, जवळील श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरासाठी त्याची निर्मिती करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा या शिलालेखातून समोर आला आहे.
*भक्ती, शिवशौर्य आणि इतिहासाचा जल्लोष*
बारव संवर्धन पूर्ण झाल्यानंतर परिसरात भंडारा उधळत गोंधळ, भक्तीगीते, स्फूर्तिगीते आणि शिवशौर्यगीतांनी वातावरण दणाणून गेले. इतिहास जपण्याच्या या कार्याचा आनंदोत्सवच साजरा करण्यात आला.
*स्वखर्चाने, निस्वार्थ भावनेतून संवर्धन*
दोनशेहून अधिक सदस्य असलेल्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानमध्ये महिला आणि पुरुषांचा सक्रिय सहभाग असून, बहुतांश सदस्य नोकरदार वर्गातील आहेत. आठवड्यातील सुट्टीचा दिवस स्वतःसाठी न वापरता हे सदस्य स्वखर्चाने आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय गड-दुर्ग, बारव, वीरगळ, सतीशिळा, समाधीस्थळे आणि पुरातन मंदिरांच्या संवर्धनासाठी खर्च करतात.
*“इतिहास जपा, पुढील पिढीला द्या”*
खोपोली, खालापूर, पनवेल, कर्जत, पेण, पाली परिसरात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानने कार्ला, नाशिक, आळेफाटा, साजगाव, कराडे, मोहोपाडा आदी ठिकाणीही संवर्धन मोहिमा राबवल्या आहेत.
"आपल्या परिसरात समाधीशिळा, वीरगळ, सतीशिळा, बारव किंवा पुरातन मंदिर आढळल्यास माहिती द्या; त्या वास्तूंचे संवर्धन आम्ही करू," असे आवाहनही प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.