दि. बा. पाटील ते नाना शंकरशेट; सन्मानासाठी जनतेची हाक
रायगड (ओमकार नागावकर)
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. “नामकरणाचा अधिकार सरकारचा आहे,” असे स्पष्ट करत न्यायालयाने निर्णय राज्य आणि केंद्र सरकारवर सोपवला. या निर्णयानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक मानले जाणारे जगन्नाथ “नाना” शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. सामाजिक संस्था, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांकडून सरकारने नाना शंकरशेट यांच्या योगदानाचा सन्मान करावा, अशी भूमिका घेतली जात आहे.
भूमीपुत्रांमध्ये संताप
नवी मुंबई उभारण्यासाठी हजारो शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. त्याग, संघर्ष आणि आंदोलनांतून हा प्रकल्प उभा राहिला; मात्र आज त्याच भूमीपुत्रांच्या नेत्याला सन्मान देण्यात सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने अनेकदा आश्वासनं दिली, प्रस्ताव मंजूर झाल्याच्या बातम्याही झळकल्या; मात्र प्रत्यक्षात “लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” अशी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे “भूमीपुत्रांचा वापर फक्त निवडणुकांसाठी केला जातो का?” असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
नाना शंकरशेट यांच्या नावासाठीही जनतेची धडपड
दरम्यान, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळख असलेल्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यासाठीही अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. मुंबईत पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी मोठे आर्थिक आणि सामाजिक योगदान देणाऱ्या नाना शंकरशेट यांनी ब्रिटिश काळात भारतीयांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
१८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेल्या भारतातील पहिल्या रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले होते. शिक्षण, महिला शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सार्वजनिक विकासकामांमध्येही त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. त्यामुळे “रेल्वेचे जनक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाने मुंबईतील मुंबई सेंट्रल टर्मिनस स्थानकाचे नामकरण व्हावे, अशी भावना नागरिकांत आहे.
विविध सामाजिक संघटना, इतिहासप्रेमी आणि काही राजकीय नेते सातत्याने सरकारकडे निवेदने देत आहेत. मुंबई सेंट्रलला “नाना शंकरशेट टर्मिनस” किंवा “नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल” असे नाव देण्याची मागणी अधिक तीव्र होत असून, सरकारने इतिहासातील योगदानाचा योग्य सन्मान करावा, महाराष्ट्र राज्य सरकारने १२ मार्च २०२० रोजी नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकार कडे पाठवला त्याला सहा वर्ष झालीत अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठी मागणी केली जात आहे.
आंदोलनाचा इशारा
स्थानिक संघटनांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाचा निर्णय आणि मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. रायगड, पनवेल, उरण, नवी मुंबई तसेच मुंबई परिसरात संतापाची लाट उसळली असून सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
निर्णय सरकारच्या गोटात
प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. याआधी २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप नाकारल्याने आता अंतिम निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकार आपला शब्द पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.