राज्य दुखवट्यात ई-टेंडर प्रक्रिया; रायगड जिल्हा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
अलिबाग (प्रतिनिधी)
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असताना रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ५० लाख रुपयांचे ई-टेंडर काढण्यात आल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी ही प्रक्रिया राबविण्यात आल्याने विविध स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ‘किचन सेट’ साहित्य खरेदीसाठी हे ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. विशेष म्हणजे, त्या दिवशी राज्यात अधिकृत शोकदिवस असल्याने बहुतेक शासकीय कार्यालये बंद होती. अशा परिस्थितीत टेंडर प्रक्रिया कोणाच्या निर्देशानुसार आणि इतक्या तातडीने पार पडली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वीही या खरेदी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जानेवारी महिन्यातच दोन वेळा टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; मात्र दोन्ही वेळा ती रद्द करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा शासकीय दुखवट्याच्या दिवशी नव्याने टेंडर प्रसिद्ध झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपयांचे किचन साहित्य खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. आधी झालेल्या खरेदीनंतरही पुन्हा नव्याने ५० लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
या प्रकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेमधील टेंडर प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार पुन्हा चर्चेत आले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.