Home

उमटे धरणाच्या गाळाची प्रशासनबरोबरच सत्ताधाऱ्यांना वाटते भीती!धरण फुटण्याची भीती दाखवून प्रशासन वेळ मारत होते,

 उमटे धरणाच्या गाळाची प्रशासनबरोबरच सत्ताधाऱ्यांना वाटते भीती!


धरण फुटण्याची भीती दाखवून प्रशासन वेळ मारत होते,


६० हजार नागरिकांच्या जीवाशी पाण्याचा घात; निवडणुकीत दिलेली आश्वासने ठरली फसवी?


“गाळ काढला तर धरण फुटेल” म्हणत जनतेची दिशाभूल; आता प्रशासनच म्हणतंय — धोका नाही!


अलिबाग (ओमकार नागावकर) 

अलिबाग तालुक्याची तहान भागवणारे आणि तब्बल ४७ गावे ३३आदिवासी वाड्याचे  जीवन असलेले उमटे धरण आज गाळ, शेवाळ आणि दूषित पाण्याच्या विळख्यात अडकले असताना सत्ताधारी आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा संताप ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. निवडणुकीत उमटे धरणाचा मुद्दा पुढे करून मतांचा पाऊस पाडणाऱ्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर या धरणाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचा आरोप उमटे धरण संघर्ष ग्रुपने केला आहे.


धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून तळ गाठू लागलेल्या धरणातून आता गाळमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वर यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून तब्बल ६० हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्यावर थेट संकट उभे ठाकले आहे.


*नळातून पाणी नव्हे… हवा येत आहे!*

रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौलसह सुमारे ४७ गावे ३३आदिवासी वाड्याना ग पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. नागरिकांच्या घरात पोहोचणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून गाळाचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“शुद्ध पाणी देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


*४५ वर्ष जुनं धरण… पण जबाबदारी घेणारा एकही नेता नाही!*

१९७८-७९ मध्ये उभारण्यात आलेल्या उमटे धरणातील गाळाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासनांचे फुगे उडवले गेले, प्रत्यक्षात एकाही सत्ताधाऱ्याने ठोस निर्णय घेतला नाही, अशी टीका संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधी धरणाच्या प्रश्नावर पूर्णपणे निष्क्रिय असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


*“धरण फुटेल”ची अफवा पसरवून जनतेला घाबरवलं?*

उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अॅड. राकेश पाटील यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, गेल्या दहा वर्षांपासून “गाळ काढला तर धरण फुटेल” अशी भीती मुद्दाम पसरवून जनतेची दिशाभूल करण्यात आली.

मात्र नुकत्याच रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता मोहन सरोदे यांनी धरणाची पाहणी केल्यानंतर धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय नेत्यांवरील अविश्वास अधिकच वाढला आहे.


*सुशोभिकरणासाठी कोट्यवधी… पण स्वच्छ पाण्यासाठी निधी नाही!*

धरणाच्या सुशोभिकरणासाठी आणि दगडी बांधकामांसाठी कोट्यवधींचा निधी सहज उपलब्ध होतो, मात्र गाळ काढण्यासाठी सरकारकडे पैसे नसतात, ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

“नवीन धरणांच्या घोषणा करण्यापेक्षा आधी अस्तित्वातील धरणे गाळमुक्त करा,” अशी संतप्त मागणी आता जनतेतून होत आहे.


*८ कोटींची निविदा… पण काम शून्य!*

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माणगाव विभागाने १५ एप्रिल २०२५ रोजी उमटे धरणातील गाळ काढणे आणि जॅकवेल दुरुस्तीसाठी ८ कोटी ८१ लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र ठेकेदारच न मिळाल्याने हे काम अद्याप कागदावरच अडकले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुयोग निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.


*“गंमत पुरे झाली… आता हिंमत दाखवा!”*

जिल्हा परिषद निवडणुकीत “मोठं मोठं गार केले गंमत म्हणून, आता उमटे धरणाचा गाळही काढा समाजाचं हित म्हणून” असे फलक झळकवणाऱ्या नेत्यांवर आता सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

“फोटोबाजी, बॅनरबाजी आणि आश्वासनांनी जनता आता फसणार नाही. जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा उमटे धरण संघर्ष समितीने दिला आहे.

Previous Post Next Post