Home

भावार्थाचा काव्यगंध... वारी कवितेची...


 भावार्थाचा काव्यगंध... वारी कवितेची....                                                       

.समिक्षक.. ह.भ प . डॉ.ज्ञानेश्वर मिरगे,                                                             राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,                                                                                                                                        संत साहित्य अभ्यासक ,शेगाव.                                                                                  9404553505. ......                                                                                                    ......................................                                                                  सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे पाचवे साहित्य संमेलन चैतन्यमय उत्साहात ,संत नगरी शेगाव येथे संपन्न झाले.संपूर्ण महाराष्ट्र देशाच्या सारस्वतांची मांदियाळी  येथे जमली होती. उद्घाटन पर कार्यक्रमाचे मान्यवर, साहित्य पंढरीचे ख्यातनाम वारकरी, श्री वंजारी साहेब, श्री वसंत पुरके साहेब ,सौ. प्रतिभाताई सराफ, शब्दवेलचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीणजी बोपूलकर,संत साहित्य अभ्यासक, डॉ. राजेशजी मिरगे 

 आणि अतिथींच्या हस्ते ,साहित्य सारस्वतातील पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात एक काव्य पुष्प होते, वारी कवितेची .कवयित्री सौ. गीताताई रक्ताडे यांचे. वारकरी पंथाच्या निष्ठावंत विचारधारेमुळे, वारी या शब्द ब्रह्माची अनुभूती मी अनुभवली आहे .वारी हा पुस्तकावरील वेधक शब्द .. काव्य वाचनाला प्रारंभ केला आणि खूप आंतरिक आनंद अनुभवाला. वाचून समाधान वाटले. कवयित्री सौ गीताताई रक्ताडे ह्या पंढरीच्या विठ्ठलाच्या विचार उपासक आहेत .त्यांच्या हृदयातून निघालेल्या भावपूर्ण उदगाराला वेगळी किनार आहे ...अनुभव आले अंगा ,ते या जगा देतसे.. या संत तुकोबांच्या उक्तीनुसार , कवयित्री सौ. गीताताई म्हणतात,.. अशीच चालू दे वारी कवितेची, अखंड राहू दे धार लेखनीची ...........

 पंढरीची वारी हा भागवत संप्रदायाचा, वारकरी पंथाचा एक आगळावेगळा आचार धर्म आहे. मराठी मायबोली बोलणाऱ्या  महाराष्ट्राला ओळखण्याची ती खूणच आहे .आज विज्ञानाने जग जवळ आले, पण माणसे माणसाजवळ आली नाहीत.हे विविध बोलक्या सत्य घटनावरुन  आज सातत्याने जाणवते . पंढरीच्या वारीचा धर्म त्यात परिवर्तन करण्याचा आहे .वारीच्या रस्त्याने जात असतांना, उचलणाऱ्या प्रत्येक पाउलावर विठुरायाचा जप होत असतो. त्यामुळे एक प्रकारचा, नामजप परम यज्ञु घडतो, असे संतांनी म्हटले आहे. वारीला जाणारा प्रत्येक वारकरी विठुराया जवळ याचना करतो की, उदारा जगदाधारा, दे मला असा वर , स्वरूपा नुसंधानी रमो चित्त निरंतर ,काम क्रोधादीकी थारा, मिळो नच मदंतरी ,अखंडित वसो मूर्ती तुझी, विठू माऊली साजिरी.... वारीतील निष्ठावंत वारकऱ्यांचे सुखावह दर्शन घडून येते ..त्यांची मनोधारणा ,जीवनातील विनम्रता जीवन मूल्यांचे श्रेष्ठत्व दर्शविते. पंढरीनाथाचे चिंतन करीत निघालेला वारकरी, आज फार मोठे विधायक कार्य करीत आहे . पारमार्थिक क्षेत्रात भक्ती हीच संपदा असून, धनसंपदेला दुय्यम स्थान आहे .वारकरी हा नेहमी उद्गारातून स्पष्ट करतो,... माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी ,बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई.. याच संत विचारांना दृष्टीसमोर ठेवून कवयित्री गीताताई यांनी, वारी कवितेची काव्यधारा लेखनाला प्रारंभ केला असे जाणवले. आणि आपले हे पहिले काव्य पुष्प त्यांनी श्री विठ्ठल रुक्माई च्या चरणी अर्पित केलेले आहे .त्यांच्या मनातील भावबंध वाचकांना जाणवतो.

 अनुभूतीतून प्रगटले ,तेच शब्द ब्रम्ही उमटीले... अशा प्रकारची भावना  सौ. गीताताईंची आहे. विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून त्या लिहितात, देवा तू गणपती मोरया गणेशा ,तुझ्या कृपेने पूर्ण होईल आशा ... वारी, सूर विठ्ठलाचे गाऊ ,देवा तुझी पंढरी, विसावला माथा, रुसलाशी कसा पांडुरंगा, जन्मभरी, माऊली ,आषाढी वारी ,माझा राया पंढरी ,आनंदाचा तू किनारा ,अशा तेरा कविता ह्या श्री विठ्ठल दैवताशी संबंधित आहेत.अतिशय सुंदर भाव विचार काव्य त्यात फुलविले आहे.  राम कृष्ण हरी हा महाराष्ट्राला मिळालेला ईश्वरी प्रसाद असून, महाराष्ट्राचा महामंत्र आहे.रामाचा आचार ,कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे राम कृष्ण हरी असा हा भाव त्यात प्रतीत होतो .याच अनुषंगाने गीताताई म्हणतात,.. संतांचे विचार राम कृष्ण हरी, चित्ती ठाम धरी हरिनाम.        सुर विठ्ठलाचे गाऊ काव्यातील,... तुझ्या दर्शनाने देवा ,जन्माचे सार्थक करू, असा आशावादही त्यांनी प्रगट केला आहे. नाही गाथा, नाही गीता, वाचली मी कधीतरी ..नाही दिंडी ,नाही वारी ,पण मला आता जाणवले.. म्हणून आता होईन मी माळकरी ..असे आंतरिक उद्गार त्या सहजपणे व्यक्त करतात एकदा  तरी प्रभू द्यावे दर्शन अशी याचना त्या मनोभावे करतात.

  जगद्गुरु संत तुकोबा महाराज भूवैकुंठ पंढरीस श्री विठ्ठलाचे दर्शनास जाण्याचे सुचवितात. आल्यांनो संसारा ,जारे पंढरपुरा..दीनांचा सोयरा पांडुरंग.. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा ..गीता ताईंनी चला पंढरीची वाट मध्ये सुद्धा हेच आवाहन केलेले आहे .निसंग होऊन का जायचे ..    पंढरीत  विटेवर उभा पांडुरंग ,खऱ्या भक्तांचे जाणूनी अंतरंग, तुम्ही तिथे जा होऊनी निःसंग संघ, चला पंढरीची वाट, तुम्ही बोलत अभंग . व्वा..व्वा..खूप छान भाव प्रगट केला आहे गीता ताईंनी.

 पारमार्थिक विचारांच्या व्यतिरिक्त, सामाजिक आशय व्यक्त करणार्या कवितांचाही समावेश या काव्यसंग्रहात आहे. प्रार्थना ,विसावला माथा, जन्मभूमी, जाणता राजा ,भारत देशा, अशा विविध कवितांचाही आस्वाद वाचकांनी जरूर घ्यावा  .आली वादळे शब्दरचनेत त्या म्हणतात ...         कितीही संकटे आली तरी, पर्वा न  राहिली, आता मागे उभी माझ्या विठू माऊली .. ही उक्ती वाचून संत तुकोबांचा एक एक अभंग माझ्या स्मरतात आला.  आता मला कशाचीही काळजी नाही कारण ,          मागेपुढे उभा राहे सांभाळीत,  आलिया आघात निवाराया.. सामाजिक आशयाच्या सावित्रीच्या लेकीमध्ये गीताताई म्हणतात, मुलगा वंशाचा दिवा असेल ,पणती मुलगी लक्षात ठेवा ,लेखू नका कमी महिलांना, स्त्री पुरुष समानता ठेवा ..राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीततेत ,..स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर असती सहाय्यके ,तरीच संसार रथ चाले सुरळीत , असा संदेश यापूर्वी दिलेला आहेच .माणसानं कसं फुलाप्रमाणे असावं, सुकून गेलं तरी ,निर्माल्य होऊन जगावे.. असे गीताताई ,कसं असावे जीवनात ह्या काव्यपंक्तीत सांगून जातात .परिवर्तनाचा विचार कवितेमध्ये असतो म्हणून कवितेबद्दल कवयित्रीला  खूप आत्मविश्वास आहे. विजयी लेखणीमध्ये, गीता ताई सांगतात , कविताच बदलेलं समाजाला, देईल दिशा या जनतेला 

एकूण ६१ पुष्प असलेल्या ह्या पुष्पमालेची गुंफण सुंदर झालेली आहे. साहित्य सारस्वतात वाचक गणाला गीता ताईंनी दिलेली ही भेट आहे, वाचकांना त्यामुळे निश्चितच आनंद मिळेल  असा विश्वास वाटतो. सौ. गीताताईंनी सातत्याने वाचन करून, सदैव शब्द संपत्तीचे वैभव  वर्धिष्णु करीत रहावे, शुभम भवतुं सदा सर्वदा.                                          


वारी कवितेची कविता संग्रह 

कवयित्री. सौ गीता नरेश रक्ताडे 8108613820.

नवीन पनवेल 

मुखपृष्ठ. - सौ निकिता रक्ताडे शिंत्रे 


समिक्षक.. ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे.                                                                   राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,संत साहित्य उपासक.                          

शेगाव जि.बुलडाणा. 9404553505

Previous Post Next Post