रॅगिंग एक अक्षम्य कृत्य
नागपूर येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालयाच्या मुलींच्या वसतिगृहातून द्वितीय वर्षाच्या तब्बल १९ विद्यार्थिनींची रॅगिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर महाविद्यालयाने तीन महिन्यांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याची वार्ता नुकतीच महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा छळ होत असल्याची आणि भीतीचे वातावरण तयार केल्या जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर कॉलेजच्या रॅगिंग विरोधी समितीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. चौकशीअंती त्यांना वसतिगृहातून तीन महिन्यासाठी बाहेर काढले असले तरी, महाविद्यालयात उपस्थित राहण्याची त्यांना मुभा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार केली त्यांना धमकावने किंवा अन्य प्रकारे छळ करण्यात येणारच नाही, हे सध्यातरी सांगता येणारे नाही.
तिथेच दुसरी एक रॅगिंगची घटना गेल्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बार्शी तालुक्यातील उकडगाव येथील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयातील वसतिगृहात घडली. अकरावीत शिकणाऱ्या कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांनी स्टंप, लाकडी काठीने बेदम मारहाण करत रॅगिंग घेतली. जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळ करणाऱ्या त्या तीन विद्यार्थ्यांवर येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आणि आता नव्या वर्षाच्या अगदी पहिल्याच आठवड्यात हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील एका शासकीय पदवी महाविद्यालयात एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन विद्यार्थिनींसह एका प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे.
वास्तविक देशात रॅगिंग विरोधी कायदा अस्तित्वात असल्याचे ज्ञात असतांना नागपुरातील या विद्यार्थिनीची रॅगिंग करण्यात आली. तर मग, पुढे त्रास देण्यात येणारच नाही. याची हमी वसतिगृह अधिकारी सुद्धा घेतील काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. वास्तविक वर उल्लेखित महाविद्यालयांसह अनेक वसतिगृह हे अशा जीवघेण्या रॅगिंगची आश्रयस्थाने झाली आहेत, हेही नाकारता येणारे नाही.
रॅगिंग कायदा म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना त्रास देणे, धमकावणे किंवा गैरवर्तन करण्यापासून रोखण्यासाठी बनवलेले कायदे, ज्यात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा, १९९९ आणि युजीसी नियम यांचा समावेश आहे. या कायद्यांनुसार रॅगिंगमध्ये शारीरिक, मानसिक छळ, अपमान किंवा भीती निर्माण करणे समाविष्ट आहे आणि यासाठी निलंबन, शिक्षा सुद्धा होऊ शकते. तसेच रॅगिंगमुळे आत्महत्या झाल्यास, रॅगिंग करणाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत यासाठी रॅगिंग विरोधी समित्यांची स्थापना केलेली असते. तरीसुद्धा असे प्रकार घडत असतील तर रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खरेच सुशिक्षित म्हणायचे काय? कुण्या नवख्याला समज देण्याइतपत संस्कारित समजायचे काय?
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांमध्ये म्हटले गेल्यानुसार कुठल्या विद्यार्थ्यास शिवीगाळ, मारहाण, धमकावणे, गैरवर्तन, जबरदस्तीने काहीतरी करायला लावणे, आर्थिक शोषण, लैंगिक शोषण, मानसिक छळ, आत्मविश्वास कमी करणे, तोंडी, लेखी किंवा शारीरिक कृतीतून त्रास देणे, अपमानित करणे, भीती निर्माण करणे म्हणजे रॅगिंग होय.
शेवटी अशी जीवघेणी रॅगिंग घेण्याचे फलित काय? "आमची वरिष्ठांनी रॅगिंग घेतली होती. आम्ही त्यांचे वरिष्ठ आहोत. महाविद्यालयात तसेच वसतिगृहात कसे राहायचे हे शिकवण्यासाठी..." अशी दिलेली कारणे सुसंगत तरी वाटतात काय? या रॅगिंग घेणाऱ्या बिघडेल विद्यार्थ्यांना माझे प्रश्न आहेत. जर एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून आला असेल किंवा दुसऱ्या एखाद्या शहरातून आला असेल तर त्याला महाविद्यालयातील किंवा वसतिगृहातील नियम समजावून सांगण्यास अधिकारी, शिक्षक आहेत ना! तुमचं काम शिकण्याचं. मग, त्याकडे लक्ष द्यायचे सोडून नुसत्या अहंकारापोटी तुम्ही उचललेले पाऊल कुणाच्या घरचा आधार हिरावून घेतो, याची साधी कल्पना तरी तुम्हाला असते काय? हेच करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी याठिकाणी पाठवले होते काय? जर ज्याची तुम्ही रॅगिंग घेता त्याठिकाणी तुमचा लहान भाऊ किंवा बहिण असती तर त्यांना तुम्ही असेच छळले असते काय? या रॅगिंगमुळे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचेच नव्हे तर स्वतःचेही आयुष्य बर्बाद करता आहात, याची जाणीव तरी तुम्हाला असते काय?
देशात दरवर्षी या रॅगिंगला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. रॅगिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चौकशीअंती दोषी आढळले तर नुसते काही महिन्यांसाठी निलंबित न करता त्यांना कायमचे निलंबित करून त्यांची रवानगी कारागृहात करायला हवी. यावरच न थांबता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा रद्द करायला हवीत. फक्त स्वतःची मौज करून घेण्यासाठी रॅगिंग घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना काय माहित की, यामुळे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न धुळीस मिळल्या जाते. संबंधित विद्यार्थ्याची मानसिक स्थिती नंतर कशी असते.
२०२५ च्या जुलै महिन्यात पाचगणी येथील एका निवासी शाळेमध्ये दोन मुलांचे त्याच वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. नववीतील दोन मुलांनी याच वर्गातील एका मुलाला अर्धनग्न केले. या भीतीने दोन्ही मुले पुण्याला पालकांकडे पळून गेली होती. यात नुकसान कुणाचे झाले? बिचाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या मनात तर धास्ती निर्माण झाली होती ना! आणि अर्धनग्न करून त्यांना कुठले नियम सांगण्यात येत होते? कुठली समज देण्यात येत होती?
२२ मे २०१९ रोजी डॉ. पायल तडवी या जळगावच्या आदिवासी डॉक्टर विद्यार्थिनीने तिच्या बरोबर असणार्या अन्य डॉक्टर विद्यार्थिनींनी व तिला शिकवणार्या एका महिला डॉक्टर शिक्षिकेने दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी तिच्या आईने तक्रार केली होती.
रॅगिंगच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाने पंचवीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरुद्ध समिती आणि अन्य उपाययोजना असतांनाही रॅगिंगच्या घटना विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस आल्याचे दिसते. जेवढ्या घटना घडतात त्यातील अतिशय थोड्या घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोड्या घटनांमधे कारवाई होते. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या घटनांविरुद्ध वारंवार निर्णय देऊनही व कडक कायदे असूनही या घटना थांबत नाहीत, ही पुरोगामी महाराष्ट्रातील फार मोठी शोकांतिका ठरते. वसतिगृहांत केवळ कॅमेरे लावून रॅगिंगच्या घटना थांबणार नाहीत. त्यासाठी वसतिगृह प्रमुखांनी नव्या विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांची विचारपूस करणे गरजेचे आहे.
१८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास तक्रार करता येऊ शकते. हा क्रमांक कॉलेज तसेच वसतिगृहाच्या भिंतीवर जागोजागी लिहायला हवा. त्याआधी हा क्रमांक लागतो की नाही, तेही तपासायला हवे. त्यासोबतच अधिकाऱ्यांचे क्रमांक सुद्धा भिंतीवर लिहायला हवेत. पालकांनी सुद्धा रॅगिंग म्हणजे काय, तसेच रॅगिंग झाल्यास काय कारवाई होऊ शकते, या सगळ्याची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे हमीपत्र द्यावे अशी व्यवस्था असावी.
२०२५ च्या एप्रिलमध्ये शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने पुढील कारवाई केली होती. पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका मुलाला त्याचे दोन वरिष्ठ त्याच्या विभागात डोक्यावरुन कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. यातून त्या विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली होती. मध्यंतरी नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये सुद्धा रॅगिंग प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. विशेष म्हणजे रॅगिंग मध्ये निवासी वसतिगृह आणि वैद्यकीय महाविद्यालये आघाडीवर आहेत, हे सर्व प्रकरणांतून दिसून येते.
मार्च २०२५ मध्ये केरळच्या कोट्टायम येथील एका नर्सिंग होमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली रॅगिंग तर केरळ विधानसभेत गाजली होती. या प्रकरणी दोषी पाच विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रभारी सहाय्यक वार्डन यास सुद्धा निलंबित करण्यात आले होते.
वास्तविक भारतीय समाजातून "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ" ही विचारसरणीच लोप पावत चालली असून ज्याला बघावं तो आपलं प्रस्थ निर्माण करू पाहतो आहे. त्यातून शिक्षणाची मंदिरं सुद्धा सुटू नये, ही मात्र फार चिंतेची बाब आहे. ज्या ज्ञानमंदिरांत समाज घडविण्याचे महत्कार्य केल्या जाते तिथेच अशी विषारी पिलावळ स्वैर फिरत असेल तर कुणाच्या घरचा आधार हिरावण्याआधी यांची नांगी निदान कठोर कायद्याची अंमलबजावणी करून ठेचायला हवी. या अशा समाजविघातक विचारसरणीला जन्म देणाऱ्या मालिका, चित्रपटांवर बंदी घालायला हवी. कारण रॅगिंग एक अक्षम्य कृत्य आहे.
लीलाधर दवंडे
कामठी (नागपूर)
८४१२८७७२२०
