..मला भेटलेली परीक्षिता..
.. निसर्ग छायेला भेट देऊन आम्ही भल्या पहाटे पूर्वेकडचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात, आणि मनांत साठवण्यासाठी सुप्रभाती बाहेर पडलो. अंधार उजेडाच्या झुंजूमुंजूतून थंडगार वाऱ्याच्या कुशीत, अलगद शिरलो. पण हाय रे देवा ! दुरून डोंगर साजरे म्हणतात तेच खरं आहे हो. कारण घरी नखाएवढाही केर नसलेल्या मुलायम फरशीवरूनही स्लीपर घालून चालणाऱ्या आमच्या पावलांना डोंगर चढावरचे खडे दगड धोंडे काट्यासारखे टोचायला लागले होते. दारुड्यासारखी पावलं वेडी वाकडी पडत होती.भन्नाट वारा कानाला दडे बसवत होता, तर शरीराचा तोल सांभाळताना अगदी नाकी नव आले होते ग बाई ! इतक्यात धाड धाड् आवाज करत ट्रॅक्टरचं धुड आलं. धडपडत एकमेकींचा हात धरत आम्ही रस्त्याच्या कडेला धावलो. आणि काय सांगू भलं मोठं ते धूड नेमकं आमच्या समोरच उभं राह्यल. कर्कश्य आवाज थांबून मंजुळ आवाज कानावर पडला, " ताई दमलात का? दमला असाल तर सांगा माझ्या गाडीतून मी तुम्हाला रोडवर सोडते." आश्चर्याने आम्ही आ वासून बघतच राहायलो, अय्या! चक्क ड्रायव्हर सीटवर बसलेली एक तरुणी आम्हाला प्रेमाने विचारत होती. बाई गं! पायात गोळे आले होते, तहान भुकेनी पोटात डोंब उसळलाच होता. आम्ही उड्या मारत पडत धडपडत मागचं सीट पकडलं. आमच्या चेहऱ्यावरची अवकळा बघून ती म्हणाली, अहो ताई, मावशी किती दमलात तुम्ही, आणि तहान पण लागली असेल नां? मोगऱ्याच्या फुलाच सुगंधी, थंडगार ताजं, माठातलं पाणी आधी प्या. आणि हो! नंतर हा आमच्या केळ बनातला फलाहार करा." तिचा तो मंजुळ आवाज, आवाजातलं मार्दव टवटवीत,सुंदर गोड चेहरा,लांब सडक वेणी आणि मधाळ आवाजातलं बोलणं ऐकून मंडळी अक्षरशः आम्ही चक्क तिच्या प्रेमातच पडलो की हो! स्त्री सुलभ स्वभाव जागृत झाला आणि आम्ही तिच्यावर प्रश्नांची फौजच सोडली. दिलखुलास हंसत ती सांगू लागली."ताई मी परीक्षिता.वरच्या अंगाला आमचं घर आहे. पुण्यात मस जागा आहेत पण माझ्या आई-बाबांसाठी हे खोपटं म्हणजे स्वर्ग आहे. आजूबाजूला शेती, केळीच्या, फळा फुलांच्या बागा लावल्यात. आई काटक्या गोळा करून चूल पेटवते आणि रांधा वाढा करून काटकसरीनें कष्ट करून संसार चालवते.आणि आमच्या मनाचं आणि शरीराचं आरोग्य संभाळते. मला बारावीपर्यंत आई बानी शिकवलं. माझ्या वडिलांनी मला मुलासारखं वाढवलय. ट्रॅक्टर चालवायला स्कूटर चालवायला शिकवलय. ह्या रस्त्यावरून स्कूटर वरून डोंगराच्या खालच्या अंगाकडे असलेल्या वृद्धाश्रमात जाऊन आजी-आजोबांची सेवा करून त्यांना मी हवं नको ते आणून देते. अगदी पडेल ते काम करायची माझी तयारी असते. माझ्या आईने केलेले भरदार गजरे मी विकते. माझी आई सुगरण आहे. राजगिऱ्याचे, डिंकाचे, दाण्याचे पौष्टिक पदार्थांचे लाडू करण्यात ती तरबेज आहे. हा खुराक खाऊन आश्रमातले आजी आजोबा खुश आणि टवटवीत होतात. आणि खुशीनें हंसत आईला आशीर्वाद देतात 'अन्नदात्री सुखी भव ' आणि ती ज्येष्ठ मंडळीआरोग्य सांभाळून निरामय आयुष्य जगतात". पण मला हे सांग पोरी, या सामसूम रस्त्यावरून जाताना तुला जनावरांची वगैरे भीती नाही का वाटत?"बांधलेल्या कुत्र्याच्या नुसत्या भुंकण्याच्या आवाजाने गर्भगळीत होणाऱ्या आमच्यातल्या एका बहाद्दरणीने हा प्रश्न विचारला.खळखळून गोड हंसताना परीक्षिता म्हणाली, "अहो ताई लहानपणी मी अगदी भित्री भागुबाई होते. पण आईबानी परिस्थितीशी, माणसांशी, जनावरांशी लढायला मला शिकवलं. चार पायाची काय दोन पायांची जनावर पण मला या रस्त्यावर आडवी आली आहेत." माणसातले राक्षस सुद्धा मी बघितलेत. परीक्षिता बिनधास्त बोलत होती.आम्ही आश्चर्याने विचारलं "अगोबाई हो का!मग अशावेळी तू कसा लढा देतेस गं?" लपवलेला धारदार विळा दाखवत परीक्षिता म्हणाली, "अहो हा आहे की माझा सोबती याच्यामुळे मी भल्याभल्यांना पळवून लावलय सूर्याच्या कोवळ्या उन्हात तळपणारा तो विळा आणि परीक्षीतेच्या चेहऱ्यावरच, डोळ्यातलं ते तेज बघून मी अवाक् झाले. सेवाव्रती, तरुण,निर्भय परीक्षीते मध्ये मला झाशीची राणी दिसली. ट्रॅक्टर वरून चढाउतरायला आम्हाला पंधरा मिनिटं लागली. पण एका क्षणात विजेच्या चपळाईने सीट पकडून परत पुढे धावणाऱ्या त्या झाशीच्या राणीला मी मनोमन सलाम केला, आणि निसर्ग छायेत शिरले. ड्रिंक पार्ट्या,अवास्तव खर्च आणि श्रीमंती लाडात वाढलेल्या ऐतखाऊ तरुणींपेक्षा ही आयुष्याच्या परीक्षेत उतरलेली परीक्षिता, माझ्या मनात कायमची ठसलीय. कधी त्या बाजूला तुम्ही गेलात ना, तर तुम्हालाही, ही झाशीची राणी भेटेल. तिच्याकडून मोगऱ्याचा,सुगंधाने ठासून भरलेला भरगच्च गजरा घ्यायला विसरू नका हं! ह्या निसर्ग कन्येला जरूरभेटा . धन्यवाद
लेखिका राधिका (माजगावकर) पंडित पुणे
