नववर्ष स्वागताचा फापटपसारा सत्कर्मी लावावा
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जातं. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण...
ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर 'जुनं ते सोनंच' असते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. असं असलं तरीही प्रत्येक दिवसात काहीतरी 'नवं' असतंच असं नाही. पण एक मात्र निश्चित त्यात 'वेगळं' काहीतरी नक्कीच असतं. आणि या वेगळेपणामुळेच उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला नवा वाटत असतो. याच वेगळेपणाचे नाविन्य ओळखले तर प्रत्येक दिवस हा नववर्षाची 'सुरुवात' ठरू शकतो.
सूर्याच्या प्रत्येक किरणाला सप्तरंग असते. ज्याला आपण 'इंद्रधनुष्य' या नावाने ओळखत असतो. या सात रंगापैकीच एक रंग स्मृतीचा असतो आणि हा स्मृतीचा रंग ज्या क्षणाला सर्वांगाने स्पर्शून जातो, तो क्षण अविस्मरणीय ठरतो. पण या रंगालाही वेगवेगळ्या छटा असतात. कधी सुखाची तर कधी दु:खाची, कधी यशाची तर कधी अपयशाची, कधी कॅन्सरची तर कधी कोरोनासारख्या व्हायरसची. पण काहीही असो, अशा क्षणामुळेच पूर्ण वर्ष अविस्मरणीय ठरत असते. म्हणूनच नववर्षाचं स्वागत करताना पाठमो-या वर्षाला विसरावं असं वाटत नाही.
ऊन पावसाचा मिलाफ होता
इंद्रधनुष्य नभी दिसतो
सुख दु:खाचे सप्तरंग अवतरता
नियतीचा खेळ कळतो
नवीन वर्ष म्हणजे विविध संकल्पाचा मुहूर्ताचा क्षण! भूतकाळाच्या अंधारात हरवलेल्या क्षणांच्या गर्ततेतून आलेली जीवनाची 'नाव' उज्ज्वल भविष्यातील स्वप्नांच्या यशाच्या किनारी लावण्याची नवी उमेद देणारा क्षण...पण स्वप्न कितीही आपुलकीनं रंगविली तरीही ते कधीच आपली होत नसतात. मानवी जीवनाची अस्थिरता आणि स्वप्नांची क्षणभंगुरता यांचं नातं कासवाच्या कवचासारखं घट्ट विणलेलं. हा त्यांचा संबंध नववर्षाच्या पहिल़्या दिवशी जाणवतच नाही. पण जुनं होणा-या वर्षाकडे पाहिलं की, हे खरं वाटायला लागतं. म्हणून मग नववर्षाचं स्वप्न रंगविणे म्हणजे तळहातावरच्या आयुष्य रेषेची लांबी मोजण्यासारखं आहे. मानवी कल्पक बुद्धीचा विचार करता...
ईश्वर साक्षी नवीन वर्षी
करीन प्रयत्न नव्या दमाने
संकल्पांच्या पुण्यतिथीला
संकल्पाचे स्मरण नव्याने
सुरू होणारं नववर्ष एक वर्षानंतर जुनं होणारं असतं. पण तरीही नववर्षाचा पहिला दिवस आपल्या आयुष्यात वेगळच महत्त्व घेऊन येतो. या दिवशी उगवणारा सूर्य तोच असला तरी नववर्षाच्या 'सुखाची भूपाळी' गात येतो. त्यामुळे त्याच्या चेह-यावर एक 'पाहुणपण' जाणवतं आणि म्हणूनच अशा पाहुण्याचं स्वागत करण्याची अदम्य इच्छाशक्ती प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्टपणे जाणवते.
इंचभराने फुगली नाही
यगायुगांची खोगिरभरती
सूर्य कारकुन रोज सारखी
सही ठोकतो मस्टर वरती
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मावळतीकडे निघालेल्या सूर्याला निरोप देताना मनाला लागलेली भावस्पर्शी हुरहुर तर दुसरीकडे गुलाबी बोच-या थंडीत कुडकुडत का होई ना थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी चाललेली लगबग यामुळे निरोप आणि स्वागताचा हा एक आनंददायी 'सोहळा' होत असतो.
मावळतीच्या वर्षात केसर रंगात अर्घ्यस्नान करून सूर्य मोतीजडीत लाल जडभरीत प्रकाशमय वस्त्र परिधान करण्यासाठी क्षीतिजाआड गळप होतांना गलबलून आलेलं हळवं मन कृत्रिम रोषणाईच्या आरासीत, फटाक्यांच्या आतषबाजीत विचारांना नाविन्याचा मुलामा चढवून नव्या वर्षात समरस व्हायला लागतं. संगिताच्या मधूर स्वरात अन् ढोलताशांच्या निनादात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजन सज्ज असते.
'सुखमय वैभवाच्या पानाफुलांनी
बहरत यावे नववर्ष
अमृतमय आनंद फळांनी
बहरावा जीवनवृक्ष'
यासारख्या लक्षवेधी शब्दांच्या संगतीनं मनही हरखून जातं. येणारी आव्हानं नव्या उमेदीनं पेलण्यासाठी हे नववर्ष प्रत्येकाला खुणावत असतं आणि प्रत्येकजन हे आव्हान पेलण्यासाठी आपआपल्या परीने तयार होत असतो आणि प्रत्येकाला सांगत असतो...
गेले दिवस विसरूनिया
करा स्वागत नववर्षाचे
पाऊल उचला न डगमगता
नव कल्पीत आशेचे
पण जरा वैचारिक दृष्टीकोनातून हा नववर्षाच्या स्वागताचा चाललेला फापटपसारा सत्कामी लावला, तर कित्येक हतबल जीवनात सप्तरंग फुलवता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणी कुणाला मदत करत नाही. त्यामुळे कुणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षाही करता येत नाही. पण असं कोणतच कार्य नाही की, ज्या कार्यासाठी कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. माणूस कसाही असो, तो कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, त्याला कुणाची ना कुणाची मदत घ्यावीच लागते. यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाला आपआपल्या परीने मदत करायला हवी. पण मदतकर्त्याने पुढच्या व्यक्तीकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नये. त्याला आपल्याच परिवारातील एक सदस्य समजायला हवे. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्याला भावनेची जाण असते. परंतु वास्तविक जीवनात असं खूपच कमी पहायला मिळते आणि हे शाश्वत सत्य आहे की, आपल्याकडून सहसा असं घडत नाही, घडलं तरी ते अवचितच. विशेष करून अनुभवात्मक दृष्टीकोनातून पाहल्यास परक्याकडूनच जास्त असं काही घडत असते. कारण या जीवनात सर्वप्रथम माणसाला माणसं ओळखण्याची कला अवगत करावी लागते. पण सद्यस्थितीत ती आपल्याजवळ नाही. ज्या व्यक्तीला आपण आपला म्हणत असतो किंवा ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास करत असतो, तोच दगा देत असतो. परंतु ज्या व्यक्तीला आपण वाईट म्हणून संबोधत असतो. वेळप्रसंगी तोच आपल्याला मदत करीत असतो.
ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकिची असते. अशांना प्रत्येक गोष्टीला तोंड देत आपलं जीवन व्यतीत करावं लागते. कोणतही कार्य करावं म्हटलं तर त्यांच्यासमोर एक आव्हानच असते. यामुळे ते एखादं कार्य इच्छा असूनसुध्दा करू शकत नाही. यामुळे त्यांच्या कार्यात खंड पडत असते. या खंडीकरणामुळे त्यांच्यासमोर पुन्हा एक मोठं संकट उभं राहते. नंतर त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. या द्विधा मन:स्थितीत त्यांची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' यासारखी होते. यामुळे त्यांची प्रगती खुंटत असते. त्यांच्याजवळ इतर सर्व काही असतानाही ते यशाचं शिखर गाठू शकत नाही. कारण आनंदाच्या अवकाशात उत्तुंग भरारी घेण्यासाठी तेही आसुसलेले असते. पण पाचविलाच पुजलेल्या गरिबीनं त्यांचे पंख गळून पडलेले असते. वैचारिकदृष्ट्या त्यांना स्वत:च्या मनाने काहीच करता येत नसते. आलेली परिस्थितीच त्यांना एखादं कार्य करण्यास किंवा न करण्यास भाग पाडत असते. पण श्रीमंतीत लोळण घेणा-यांना किंवा दोन नंबरने कमाई करणा-यांना गरिबांची अवस्था काय कळेल?
साकार व्हावी सारी स्वप्ने
पोचावे यशाच्या उत्तुंग शिखरी
ध्येय,जिद्द अन् चिकाटीने
घ्यावी आकाशी उंच भरारी
आज जग आधुनिक झालं आहे. सुख-सोयींची सर्वच साधनं क्षणात मिळविता येतात. एक आदेश दिला की रूचकर जेवनाचं ताट तुमच्यासमोर असेल. पण त्याचवेळी तुमच्या शेजारच्या झोपडीत कुणीतरी भुकेल्या पोटाने झोपी जायच्या प्रयत्नात असेल. विचार करा, आपल्या प्रयत्नाने जर त्याची भूक शमविता आली तर त्यातून मिळणारं समाधान लाखो रुपयांना पुरून उरेल. गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला झोकून देणा-यांनी फुटपाथवर कुडकुडत रात्र काढणा-या निष्पाप जीवावर मायेने एक ब्लँकेट पांघरले, तर त्यांच्या अंतर्मनातून निघणारा आशीर्वाद लाख तोळे सोन्याच्या तुलनेत केव्हाही मोठाच राहील.
असता श्रीमंती जवळ
नको गर्व कसला मनी
सतत करावे दान धर्म
व्हावे गरिबांचे ऋणी
आता समाजाने विशेषत: युवा पिढीने आपला जीवनक्रम बदलायला हवा. मी, माझं घर, माझं आयुष्य या तीन घटकात गुरफटत राहण्यापेक्षा आपलं जीवन इतरांच्या कामी आलं तो क्षणच आनंदाचा क्षण असं समजून या कोमेजलेल्या रोपाला मदतरूपी पाणी देऊन नवीन अंकूर फुलविण्याचा संकल्प करायला पाहिजे. खरं तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद दडलेला असतो. त्यासाठी फक्त दुस-याच्या सुखासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करता यावा लागतो. मग अश्रू हे दुबळ्यांच्या डोळ्याचे वैैभव अन् त्याग ही श्रेष्ठ माणसांची संपत्तीच नव्हे का? म्हणून जे व्यक्ती स्वत:चे अश्रू पापण्यांमध्ये लपवून दुस-याच्या ओठावर हसू फुलवितात त्यालाच सर्वजन प्रणाम करतात, याचा विसर पडू देऊ नये.
सुख-दुःखाच्या वाटेवरती
मदतीचा हात द्यावा
आपुलकीच्या नात्यांनी
जीवन सुंदर व्हावा.
यासाठी आपल्या मिळकतीचा काही भाग अंधारातही आशेचा किरण शोधणा-यांसाठी खर्च करायला पाहिजे. त्यांना प्रेमाची छाया देऊन समस्यारूपी सूर्याच्या अतिनील किरणांपासून मुक्त करून जगण्याची नवी दिशा द्यायला हवी. अशाप्रकारे त्यांना उध्वस्त जीवनाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांचे भविष्य घडवायला हवी. तरच ख-या अर्थाने आपल्या वैभवाला अर्थ आहे, नाही तर सारं काही व्यर्थ आहे.
आसपास दिसता गरिबी
माणुसकी दाखवावी
ना उच्च निच कोणी
समानता पसरवावी
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
