देगाव - बालकाव्य उत्साहात संपन्न...
पुणे (वार्ताहर)
देगाव -जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काव्ययोग काव्य संस्था, पुणे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. हे संमेलन निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या सहकार्यातून पार पडले.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा. किरणजी केंद्रे (कार्यकारी संपादक, बालभारती – पुणे) होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी सौ. वसुधा नाईक (बालसाहित्यिक व कवयित्री), श्री. श्रीपाद कोंडे (ज्येष्ठ साहित्यिक), काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे, शाळेच्या केंद्रप्रमुख साधना गायकवाड, मुख्याध्यापक मधुकर यादव, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संमेलनात एकूण २६ विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आशयपूर्ण कवितांचे सादरीकरण केले. यातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या ५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मानपत्र, पुस्तक व पदक देण्यात आले. उर्वरित सर्व बालकवींनाही प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
भोर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्रथमच विद्यार्थ्यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. व्यासपीठ मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष भावूक करणारा होता.
उद्घाटनप्रसंगी लक्ष्मण शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कविता लेखन व सादरीकरणाच्या संधी मिळाव्यात यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात किरणजी केंद्रे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या लेखनाला बळ देण्यासाठी अशा कवी संमेलने मार्गदर्शक ठरतील, तसेच निवडक कविता किशोर मासिकात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद कोंडे यांनी हा उपक्रम यशस्वी ठरेल, असे मत व्यक्त करून भोर तालुकास्तरीय बाल कवी संमेलन घेण्याची सूचना मांडली.
सौ. वसुधा नाईक यांनी बालकवितांतील भावविश्व उलगडून सांगितले. तर योगेश हरणे यांनी प्रास्ताविकात जिल्हास्तरीय बाल कवी संमेलन घेण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल पवार यांनी केले. संपूर्ण नियोजन श्री. महेंद्र सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक श्री. योगेश पवार यांनी केले.सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्तम साजरा झाला.
