सिडकोच्या 'ग्रीन कॉरिडॉर धोरणातून नवी मुंबई ला पहिले शहरी कृषी केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा
पेण (प्रतिनिधी)
उच्चदाब वीजवाहिन्यांच्या खालील जमिनीचा हरित विकासासाठी उपयोग करण्याच्या सिडकोने स्वीकारलेल्या दूरदृष्टीपूर्ण 'ग्रीन कॉरिडॉर' धोरणामुळे नवी मुंबईतील पहिले शहरी शेती केंद्र साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोने २००८ साली सेक्टर-५, उत्सव चौकाजवळ, खारघर येथे कोकण कृषी विकास प्रतिष्ठान (केकेव्हीपी), मुंबई यांना नर्सरी तथा कृषी माहिती केंद्रा' साठी भूखंड उपलब्ध करून दिला होता.
खारघर येथील नर्सरी- तथा कृषी माहिती केंद्रामार्फत केकेव्हीपीने केलेल्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक कार्याला व्यापक मान्यता मिळाली असून, त्यातूनच शहरी शेती, नैसर्गिक शेती व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी केकेव्हीपी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , दापोली यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात शहरी शेती उपक्रम अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे.
शाश्वत व वैज्ञानिक शहरी शेतीच्या प्रसारासाठी केकेव्हीपीने दिलेल्या योगदानाची दखल घेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण कृषी विकास प्रतिष्ठान खारघर सोबत हा सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत प्रात्यक्षिके, जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, क्षमता वृद्धी व अभ्यास दौरे यांसारख्या विस्तार उपक्रमांवर भर देण्यात येणार असून, शहरी शेती, नैसर्गिक शेती व उद्योजकतेला विशेष प्राधान्य देण्यात येईल. या उपक्रमाचा लाभ नवी मुंबईसह इतर शहरी व उपनगरातील शेतकरी, शहरी उत्पादक आणि कृषी उद्योजकांना होणार आहे.
यावेळी डॉ. मंदार गीते, कार्यक्रम समन्वयक, केकेव्हीपी यांनी (केकेव्हीपीच्या) विविध उपक्रमांची माहिती देत शहरी शेतीमुळे अन्नसुरक्षा, हरित क्षेत्रवाढ, हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता व शहरी जैवविविधतेत वाढ कशी होते यावर प्रकाश टाकला. शेखर सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त, केकेव्हीपी यांनी विद्यापीठाशी असलेल्या या सहकार्याद्वारे ज्ञानविनिमय, कौशल्य विकास तसेच नवी मुंबई, खारघर येथे 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून शहरी शेती केंद्र उभारण्याची गरज अधोरेखित केली.
हा सामंजस्य करार नुकताच . डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली; डॉ. सतीश नारखेडे, शिक्षण संचालक, . शेखर सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त, केकेव्हीपी; डॉ. मंदार गीते, कार्यक्रम समन्वयक, केकेव्हीपी तसेच डॉ. संतोष वरवडेकर यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे करण्यात आला.
