खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा; 20 लाखांची सुपारी, 12 आरोपी अटकेत
खोपोली | प्रतिनिधी
खोपोली शहराला हादरवून टाकणाऱ्या नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांच्या पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे उर्फ आप्पा यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी मोठा उलगडा केला आहे. वैयक्तिक व राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या हत्येसाठी तब्बल 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर गुन्ह्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी शाळेतून मुलींना सोडून परतताना हल्ला
26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 6.45 वाजता मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना खोपोली येथील शिशुमंदिर शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलींना शाळेत सोडून परत येत असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विहारी परिसरातील जया बार समोरील चौकात त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी तलवार, कोयता व कुऱ्हाडीने सपासप वार करत मंगेश काळोखे यांची जागीच निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर खोपोली शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.
गुन्हा दाखल; 8 विशेष पथकांची स्थापना
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 366/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 स्वतंत्र पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली.
24 तासांत तपासाला गती; कटाचा पर्दाफाश
भौतिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत तपासाला वेग दिला. तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी रविंद्र परशराम देवकर याने मंगेश काळोखे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक व राजकीय वैमनस्यातून हत्या करण्याचा कट रचला होता.
या कटासाठी त्याने ओळखीची महिला ईशा पापा शेख (वय 46) हिच्या माध्यमातून आदिल मुख्त्यार शेख व खालिद खलील कुरेशी यांना 20 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
पाच जणांनी थेट हल्ला केल्याचे स्पष्ट
सुपारीनुसार दर्शन रविंद्र देवकर, महेश शिवाजी घायतडक, आदिल शेख, खालिद कुरेशी व आणखी एका आरोपीने थेट हल्ला करून मंगेश काळोखे यांची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात थेट हल्लेखोरांसह कट रचणारे व गुन्ह्यानंतर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
12 आरोपी अटकेत; एक फरार
या प्रकरणात आतापर्यंत रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनंजय देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश घायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पाटर, ओंकार मगर यांच्यासह विधीसंघर्षग्रस्त बालक सचिन चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ईशा शेख व आदिल शेख यांनाही अटक करण्यात आली असून खालिद कुरेशी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
जलदगती न्यायालयात खटला चालवणार
सध्या सर्व अटक आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून विशेष सरकारी अभियोक्त्यांच्या मदतीने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी रायगड पोलीस दल प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.
खोपोलीत तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
या हत्याकांडानंतर खोपोली शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलू उघड करण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत.
