Home

आंबेपूर हा राजाचा गड-आ. महेंद्र दळवी


 आंबेपुर हा राजाचा गड- आ. महेंद्र दळवी

श्रीगाव(प्रतिनिधी)

अलिबाग, ता.५: शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी अलिबागमध्येच नाही तर संपुर्ण जिल्ह्यात चांगले काम केले आहे. आंबेपुर मतदार संघात सातत्यपुर्ण कामांमुळे येथे शिवसेनेचे मताधिक्य दिवसेंदिवस वाढत असून हा मतदार संघ राजाभाई केणी यांचा गड असून या मतदार संघात त्यांच्या पत्नी रसिका केणी यांचा निर्विवाद विजय होईल. त्याचबरोबर या मतदार संघाबरोबरच महाड, पोलादपुरमध्ये मंत्री भरतशेट गोगावले, कर्जत खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या मोर्चेबांधणीतून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यात कोणीही अडचण येणार नाही. त्यामुळे शिवसेनेला कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची गरज नाही, असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.


जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील काही दिवसातच जाहीर होणार असून त्यापुर्वीच अलिबाग विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. थळ मतदार संघात मानसी दळवी, मापगाव मतदार संघात दिलीप भोईर यांच्यानंतर आंबेपुर मतदार संघाची शिवसेनेच्या उमेदवार म्हणून रसिका केणी यांच्या प्रचाराचा नारळ आमदार महेंद्र दळवी यांनी फोडला आहे. रविवार (ता.४) आंबेपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत रसिका केणी यांना विजयी करण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पांडवादेवी येथे आयोजित आढावा बैठकीला हजारोंच्या संख्येने परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कामगार नेते दीपक रानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर, महिला संघटीका संजिवनी नाईक यांचीही भाषणे झाली. 

-------

*विकासकामांच्या जोरावर निश्चित विजय मिळणार- रसिका केणी*

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून प्रचाराला वेग आला असून, आंबेपूर मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका केणी यांनी आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी विकासकामे, लोकांचा विश्वास आणि पुढील वाटचाल यावर भर दिला. रसिका केणी म्हणाल्या की, आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. याच विकासाच्या पायावर जनतेचा विश्वास असून, “राजाभाईच्या रूपाने मला जिंकून द्या,” अशी भावना मतदार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान मतदारसंघातील विविध भागांत फिरताना आलेले अनुभव सांगताना रसिका केणी म्हणाल्या, गोरगरीब, सामान्य नागरिक माझ्यावर प्रेमाने कौतुकाची थाप मारत आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. त्यांच्या आशीर्वादानेच मी निश्चितपणे जिंकून येईन, असा मला पूर्ण विश्वास आहे. महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा ठाम शब्द दिला. बचत गटांच्या माध्यमातून घरघंट्यांचे वाटप पारदर्शक व न्याय्य पद्धतीने केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडून आल्यानंतर कोणतेही राजकीय हेवेदावे न बाळगता सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार असून, पक्षभेद विसरून विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राजकारणाच्या पद्धतीवर भाष्य करताना रसिका केणी म्हणाल्या, आधी काम करायचं आणि नंतर नारळ फोडायचा, हा राजाभाई केणी यांचा ठरलेला आणि विश्वासार्ह पॅटर्न आहे. मात्र याआधी काही ठिकाणी कामे मंजूर करून प्रत्यक्षात ती पूर्ण न करताच खोटी बिले काढण्याचे प्रकार झाले. अशा खोटारड्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांना मतदान करण्यापासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

जे सख्या मामाचे, भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे कसे होणार- राजाभाई केणी

दरम्यान, याच सभेत शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आंबेपूर मतदारसंघ हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता; परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी, जे सख्या मामाचे किंवा भावाचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला. भाजपमध्ये प्रवेश करून आता आंबेपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या काही नेत्यांवर टीका करताना राजाभाई केणी म्हणाले की, या नेत्यांनी येथील विविध औद्योगिक कंपन्यांना विरोध केला. त्यामुळे या परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी उद्योगविरोधी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या अशा नेत्यांना आता जनता योग्य जागा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच, विकासकामे, जनतेचा विश्वास आणि संघटनेची ताकद यांच्या जोरावर शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा दावा करत या सभेने आगामी निवडणुकांसाठी राजकीय वातावरण अधिक तापवले आहे.

Previous Post Next Post