संत निरंकारी मिशनद्वारे भिलजी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:१३५ जणांनी केले स्वेच्छेने रक्तदान
अलिबाग(वार्ताहर)
निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी भवन भिलजी या ठिकाणी रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून परिसरातील एकूण १३५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अन्य सज्जनांनीही भाग घेतला. यामध्ये १९ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी रक्त संकलन केले.
या रक्तदान शिबिराचा शुभारंभ संत निरंकारी मंडळाचे रायगड क्षेत्राचे सेवादलाचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभूच्या नामस्मरणाने करण्यात आले. यावेळी महाड युनिट संचालक अनिल सकपाळ हेही उपस्थित होते. जिल्हा रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. भैरवी मंदाडकर तसेच भिलजी गावातील ग्रामस्थ व अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शिबिरास सदिच्छा भेट देवून संत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले आणि मिशनच्या सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा दिल्या.
उल्लेखनीय आहे, की संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची सुरुवात १९८६ मध्ये झाली असून त्यावेळी निरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला की, "रक्त नाल्यांमध्ये नाही, तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे." संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश आज वर्तमान काळात सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे चालू ठेवला आहे.
सदर रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी सेवादल आणि निरंकारी भक्तांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार भिलजी ब्रँच मुखी सुरेश गावंड यांनी निरंकारी प्रकाशन देऊन मानले.
