Home

व्हायरल पैशांचा व्हिडीओ: महेंद्र दळवी आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय वाद, अलिबागमध्ये निषेध मोर्चा


 व्हायरल पैशांचा व्हिडीओ: महेंद्र दळवी आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय वाद, अलिबागमध्ये निषेध मोर्चा

रायगड - अमुलकुमार जैन 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यातील आरोप–प्रत्यारोपांचा सूर चढला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित पैशांच्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापवले आहे. दानवे यांनी हा व्हिडीओ शेअर करत दावा केला की, महेंद्र दळवी नोटांच्या ढिगाऱ्यासोबत दिसत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.


अलिबागमध्ये यावर प्रतिक्रिया म्हणून शिंदे गटाचे स्थानिक नेते आणि शिवसैनिक जोरदार निदर्शने करताना दिसले. जिल्हा प्रमुख राजा केणी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर मोर्चे काढण्यात आले. यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले. या वेळी दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि बनावट व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


दरम्यान, महेंद्र दळवी यांनी या व्हिडीओला पूर्णपणे फेक आणि मॉर्फ केलेला असल्याचा दावा करत त्याचा जोरदार खंडन केला. “जर या व्हिडीओत मी अंशतःही असेल, तर आमदारकीचा राजीनामा देईन,” असे त्यांनी खुले आव्हान दिले. दळवी यांनी हा व्हिडीओ “बड्या नेत्याकडून हेतुपुरस्सर प्रसारित” झाला असल्याचा आरोप केला आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोपही केला. महेंद्र दळवी यांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचे जाहीर केले.


या वादात महेंद्र दळवींची पत्नी मानसी दळवी देखील पुढे आल्या. त्यांनी दानवे यांना आव्हान दिले की, “व्हिडीओतील चेहरा सिद्ध करा; केवळ आरोप करून राजकारण करू नये.” तसेच, त्यांनी या प्रकरणामुळे कुटुंबाची प्रतिमा मलिन होत असल्याची नाराजी व्यक्त केली. मानसी दळवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील सांगितले.


राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या कथित व्हिडीओमुळे शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तणाव वाढला आहे. व्हिडीओची सत्यता, त्यामागचा हेतू आणि आरोपांची दिशा अद्याप अस्पष्ट असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गोंधळग्रस्त झाले आहे.


सदर प्रकरणात आता सर्वांचे लक्ष पोलीस चौकशी आणि पुढील कारवाईकडे लागले आहे.

Previous Post Next Post