Home

भविष्यात पैशाचे महत्त्व शुन्य नि काम ऐच्छिक ठरेल... लेखक सुनील शिरपुरे


 भविष्यात पैशाचे महत्त्व शुन्य नि काम ऐच्छिक ठरेल



       आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळातील सर्वात परिवर्तनशील तंत्रज्ञानापैकी एक आहे. हे आपले जीवन, कार्यपद्धती आणि संवाद साधण्याची पद्धत बदलत आहे. एआय हे एकप्रकारे मशीनच्या रुपात मानवाप्रमाणे समस्या सोडवणे, निर्णय क्षमता, तर्कसंगतता व नवीन गोष्टी शिकण्याचे काम करते.

       आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची संकल्पना प्राचीन काळापासूनची असून यात अनेक कथांचा देखील समावेश आहे. एआयचा औपचारिक अभ्यास हा २० व्या शतकात सुरु झाला. १९५६ मध्ये जॉन मॅकार्थी यांनी सर्वात प्रथम डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ ही संकल्पना वापरली. येथूनच एआयच्या अभ्यासाला सुरुवात झाली. एआयच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९५० मध्ये ॲलन ट्युरिंग यांनी केलेली ट्युरिंग चाचणी. ही चाचणी मशीनची बुद्धिमत्ता क्षमता ही मानवी वर्तनाच्या तुलनेत वेगळी नसते हे स्पष्ट करते. येथूनच, भविष्यातील एआय संशोधन आणि विकासाचा पाया घातला गेला. 

       रोबोटिक्सचे भविष्य खूप महत्त्वाचे आहे, कारण ते मानवी जीवन अधिक सोपे, कार्यक्षम आणि सुरक्षित बनवेल. रोबोट्स आता केवळ उत्पादनापुरते मर्यादित नाहीत, तर ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अधिक स्वायत्तपणे विचार करतील, शिकतील आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेतील. यामुळे आरोग्यसेवा, शिक्षण, आपत्कालीन व्यवस्थापन आणि वाहतूक यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. रोबोट ही अशी साधने आहेत जी स्वायत्तपणे जाणू शकतात, तर्क करू शकतात, योजना करू शकतात आणि कृती करू शकतात. स्वतंत्रपणे कामे करण्यासोबतच ते मानवी क्षमता वाढवू शकतात आणि मानवी कृतींची नक्कल करू शकतात.

       भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणा-या रोबोटिक्स बाजारपेठांपैकी एक आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ पर्यंत भारतात रोबोट स्थापनेत सुमारे ८४ टक्के वाढ झाली. वार्षिक औद्योगिक-रोबोट स्थापनेच्या बाबतीत भारत आता जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. २०२५ मध्ये रोबोटिक्सचे भविष्य हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण या क्षेत्राने सिद्धांताच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अवलंबनात प्रवेश केला आहे.

       एआयच्या विस्तारामुळे एकीकडे नोक-यांवर टांगती तलवार उपस्थित झाली आहे. तर दुसरीकडे एआयच्या वाढत्या जाळ्यामुळे भविष्यात नोकरी गरजेपेक्षा छंद म्हणून केली जाईल. लोकं फक्त आवड म्हणून नोकरी करतील. हा बदल समाजाच्या रचनेत मूलभूतपणे बदल करेल आणि लोकांच्या भूमिका पूर्णपणे बदलेल. या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी धक्कादायक भविष्यवाणी करत एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सद्वारे पूर्णपणे बदललेल्या भविष्यातील जगाचे व्यापक दृष्टिकोन सादर केले.

      पुढच्या १०-२० वर्षात एआय आणि रोबोटिक्स इतके प्रगत होतील की जगातील बहुतेक कामं ही मशीन्स करतील. लोकं इच्छा असेल तरच काम करतील. जेव्हा मशीनच सर्व गरजा विनामूल्य किंवा अतिशय स्वस्तात पूर्ण करू लागतील, तेव्हा सध्याची चलनव्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. तुमच्या खिशातला पैसा, नोटा आणि बँक कार्ड्स भविष्यात कदाचित काहीही कामाचे राहणार नाहीत. एआय आणि रोबोटिक्स झपाट्याने विकसित झाल्यास 'पैसा' हे फक्त औपचारिक साधन राहील. कारण एआय आणि रोबोटिक्स इतक्या वेगाने प्रगत होतील की, उत्पादनासाठी मानवशक्ती किंवा मोठ्या संसाधनांची गरजच उरणार नाही. वस्तूंची मुबलकता वाढली तर 'पैसा' या संकल्पनेची किंमत उरेलच असे नाही. 

       भविष्यात ऊर्जा हीच खरी करंसी ठरू शकते. ऊर्जा ही उत्पादनाची मूळ ताकद असल्याने तिचे महत्त्व पैशापेक्षा जास्त होईल. इलॉन मस्क यांनी स्कॉटिश लेखक इयान बँक यांच्या 'कल्चर' सीरिजचा दाखला देत एका अशा समाजाचे वर्णन केले आहे की, जिथे काहीच कमी नसते आणि पैसा अस्तित्वातही राहत नाही. सोलर पावर्ड एआय आणि स्पेसमधून ऊर्जा मिळवणा-या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अशी दुनिया वास्तवात उतरण्याची शक्यता व्यक्त केली.

       जग जसं पुढे चाललं आहे, तसं जगाचे भविष्य एआयद्वारे ठरवले जाईल आणि त्या जगात 'पैसा' नाहीसा होईल. नोक-या पर्यायी छंद बनतील म्हणजेच लोकांना जीवन जगण्यासाठी काम करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि गरिबी अस्तित्वात राहणार नाही. एआय आणि ह्युमनॉइड रोबोट्समध्ये पहिल्यांदाच ख-या अर्थाने गरिबी दूर करण्याची क्षमता आहे. कारण जेव्हा ह्युमनॉइड रोबोट्स उत्पादन स्वस्त आणि जलद करतील, तेव्हा मूलभूत वस्तू इतक्या परवडणा-या होतील की आर्थिक संकट येणार नाही. तसेच लोकं कोणतेही उत्पादन आणि सेवा सहजपणे मिळवू शकतील. 

       टेस्ला ही ह्युमनॉइड रोबोट्स विकसित करणारी एकमेव कंपनी राहणार नाही. अनेक कंपन्या ह्युमनॉइड रोबोट्स विकसित करतील आणि तंत्रज्ञान जगाला श्रीमंत करेल. एआय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान जगातील प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. या प्रणाली विकसित होताना मानवी जीवनातील आर्थिक संघर्ष पूर्णपणे संपुष्टात येतील आणि मानवांना काम करायचे की नाही हे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. जेव्हा रोबोट सर्व कामं हाती घेतील तेव्हा सरकारला युनिव्हर्सल हाय इन्कम प्रदान करावे लागेल, जे साध्या मूलभूत उत्पन्नापेक्षा खूप जास्त असेल. येत्या काळात हा बदल अधिकाधिक स्पष्ट होईल.



  शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे

    कमळवेल्ली,यवतमाळ

भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Previous Post Next Post