मुंब्रा येथील बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश:अलिबाग सत्र न्यायालयात दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा
अलिबाग – अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील उच्च न्यायालयाने बनावट नोटा तयार करून बाजारात फेरफार करणाऱ्या दोन आरोपींना ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. मुंब्रा येथील मोहम्मद आवेश मोहम्मद अकबर शेख व सोहेल शरफराज खान या दोघांना शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करून वापर केल्याप्रकरणी अलिबाग येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. भगत यांनी शिक्षा सुनावली. यामध्ये दोघांवर एकत्रित ३५,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
ही कारवाई पेण पोलिसांनी २०२२ मध्ये उघडकीस आणलेल्या महत्त्वाच्या प्रकरणाला मिळालेला निकाल असून, सरकार पक्षाच्या अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कोमल राठोड यांनी मांडलेला ठोस युक्तिवाद या निकालात निर्णायक ठरला. एकूण १३ साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित पुराव्यांची सांगड घालत न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे नमूद केले.
८ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आरोपींनी शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करून अॅक्टीव्हा मोटारसायकल (MH06 KB 5769) च्या डिकीत लपवून ठेवल्या होत्या. फिर्यादी गिरीष पाटील यांच्या दुकानातून सिगारेट खरेदी करण्यासाठी त्यांनी बनावट नोट वापरली. उर्वरित रक्कम परत घेतल्यानंतर दुकान मालकाला नोट संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
दरम्यान, पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात बनावट नोटा, नोटा तयार करण्याचे साहित्य आणि उपकरणे जप्त करण्यात आली. तसेच एका पंच साक्षीदारालाही त्यांनी बनावट नोट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींवर भादं sections 489(A), 489(B), 489(C), 489(D) सह ३४ या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाला. नोटा तयार करणे, बाळगणे व बाजारात वापरणे हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
मुख्य आरोपी मोहम्मद आवेश याला ४८९(D) या स्वतंत्र कलमान्वये अतिरिक्त शिक्षा व १५,००० रुपये दंड देण्यात आला आहे, तर सोहेल खानलाही समान शिक्षा ठोठावण्यात आली.
पोलिस व सरकारी अभियोक्त्यांचे मोलाचे कार्य
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डी.आर. पोंळ (पेण पोलीस ठाणे) यांची साक्ष तसेच पोलिस हवालदार सचिन खैरनार, पांडुरंग पाटील, सुनील डोंगे, प्रविण पाटील, रमेश कुथे आणि संदेश नाईक यांच्या सहकार्यामुळे हा गुन्हा सिद्ध करण्यात यश आले.
अभियोक्ता कोमल राठोड यांनी मांडलेल्या तीक्ष्ण युक्तिवादामुळे अखेर गुन्हेगारांना शिक्षा होऊन जिल्ह्यात बनावट नोटा व्यवहारास आळा बसला आहे.
या निकालामुळे रायगड जिल्ह्यात बनावट नोट प्रकरणात कायद्याचे वर्चस्व आणखी ठळक झाले आहे.