अलिबागमध्ये प्लास्टिक बंदीविरोधी धडक मोहीम; ६ किलो प्लास्टिक जप्त, दंडातून जागरूकतेचा संदेश
अलिबाग – अमुलकुमार जैन
अलिबाग नगर परिषदेने शहरात प्लास्टिक बंदीसंदर्भात धडक मोहीम राबवून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेअंतर्गत शहरातील हॉटेल, दूध उत्पादक व्यवसाय, किरकोळ दुकानं तसेच सुपरमार्केटवर तपासणी करण्यात आली. तपासणीत ६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या गेल्या, तर ₹10,500/- दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, मुकादम प्रकाश तांबे, मुकादम सुमित गायकवाड तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी सक्रिय सहभागी झाले. अधिकारी म्हणतात की, या कठोर कारवाईमागे उद्देश नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे.
नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, प्लास्टिक पिशव्या टाळाव्यात आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. शहरातील दुकानदारांनीही या मोहिमेला सहकार्य दर्शवून प्लास्टिक मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे नियमांचे पालन करणाऱ्या दुकानदारांमध्ये जागरूकता वाढेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. नगर परिषदेच्या कठोर पावल्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना पर्यावरणपूरक वर्तन अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.
या मोहिमेने अलिबाग शहरात स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, असे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
