Home

मराठी भाषेच्या अभिजात गौरवाला शब्दसाज चढवणारा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा!


 मराठी भाषेच्या अभिजात गौरवाला शब्दसाज चढवणारा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा!

पुणे(वार्ताहर)

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि समितीचे आभार” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद, शांताबाई शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सभागृहात उपस्थित साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि मान्यवरांच्या साक्षीने सुप्रसिद्ध निवेदिका स्नेहल येवला यांनी सादर केलेल्या भावपूर्ण सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. शब्द, सूर आणि भाव यांचा सुरेख संगम असलेल्या या स्तवनामुळे संपूर्ण सभागृह भक्ती, साहित्य आणि संस्कृतीच्या वातावरणाने न्हाऊन निघाले. उपस्थित साहित्यिकांच्या आग्रहास्तव ‘झेंडा’ फेम गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या भारदस्त, भावपूर्ण आणि प्रभावी आवाजात “जगण्याच्या पाया” आणि “विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती” ही अत्यंत लोकप्रिय गाणी सादर केली. त्यांच्या गायनाने सभागृहात उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. टाळ्यांच्या कडकडाटात संपूर्ण सभागृह सुरेल आनंदाने दुमदुमून गेले.

कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अभ्यासू समीक्षक राजन लाखे सर आणि ‘झेंडा’ फेम सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्या कवींना पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रशस्तिपत्रके आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. आपल्या सखोल आणि अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणात राजन लाखे सर म्हणाले, “शब्दसौंदर्य, रूपसौंदर्य, भावसौंदर्य, कार्यसौंदर्य, भाषासौंदर्य, विचारसौंदर्य, काल्पनिकसौंदर्य, लयसौंदर्य आणि नादसौंदर्य या नऊ पैलूंनी जेव्हा कविता परिपूर्ण होते, आणि त्या कवितेचे गाणे होते, तेव्हाच ती खरी, कालातीत कविता ठरते.” मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक दशके साहित्यिक, अभ्यासक आणि रसिकांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हा दर्जा म्हणजे केवळ मानाचा मुकुट नसून भाषेवरील जबाबदारीही आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तसेच दर्जा प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञतेच्या भावनेतून पुन्हा आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या काव्यस्पर्धा उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान मराठी साहित्य चळवळीत मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी राजेंद्र उगले, दिगंबर ढोकले आणि प्रतिभा खैरनार यांनी स्पर्धेविषयी आपली मनोगते व्यक्त केली. अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे नवोदित कवींना व्यासपीठ मिळते, मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती समोर येते आणि अभिजाततेचा खरा अर्थ अधोरेखित होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास उद्योजक शांताराम गायकवाड, उद्योजक प्रकाश चव्हाण, तसेच कवी संतोष साळुंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच राष्ट्रीय काव्यस्पर्धेतील विजेते प्रतिभा विभूते, पुणे. राजेंद्र उगले, नाशिक. संगीता भालेराव, दौंड. डाॅ. प्रविण किलनाके, गडचिरोली. सुवर्णा पवार, कोल्हापूर. बी डी घरत, रायगड. शैलजा जाधव, चांदवड. संजय कावरे, अकोला. सोनाली कांबळे, धाराशीव. श्रद्धा काळे, ठाणे. संध्या केळकर, मुंबई. स्नेहल येवला, ठाणे. शीतल यादव, परतवाडा. शिल्पा वाघमारे, अकोला. माधुरी मंगरूळकर, पुणे. दिगंबर ढोकळे, भोसरी. प्रतिभा खैरनार, नांदगाव. सीताराम करकरे, निगडी. मंगला भोयर, यवतमाळ. स्मिता पेशवे, उस्मानाबाद. रेखा मालपुरे, कल्याण. निलिमा फाटक, निगडी. व सर्वांच्या परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी, शिस्तबद्ध आणि रसाळ सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्नेहल येवला यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, विश्वस्त अश्विनी पाचारणे आणि विश्वस्त संदीप राक्षे यांनी केले. समारोपप्रसंगी आयोजकांनी सर्व मान्यवर पाहुणे, कवी, रसिक, स्पर्धक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. पसायदानाच्या सामूहिक उच्चाराने सभागृहात सद्भावना, करुणा, शांती आणि मराठी भाषेच्या गौरवाची भावना ओतप्रोत भरून राहिली. मराठी भाषेच्या अभिजाततेचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम उपस्थित प्रत्येकाच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post