Home

नगराध्यक्षपदासाठी आराधना दांडेकर; पडद्यामागील नेतृत्वावर उमटले प्रश्न


 नगराध्यक्षपदासाठी आराधना दांडेकर; पडद्यामागील नेतृत्वावर उमटले प्रश्न

रायगड – अमूलकुमार जैन


मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांची कन्या आराधना दांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर मुरुडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय चर्चांना उधाण आले असून मतदारांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांना नगरपालिका कामकाजाचा दीर्घ अनुभव, प्रशासन हाताळण्यातील कौशल्य आणि शहरातील विकासकामांची सखोल माहिती असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने अनेक प्रकल्प राबवले. मात्र त्यांच्या कन्या आराधना दांडेकर या राजकारणात नवोदित असल्याने नगरपरिषद चालवण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर वाढत आहे.


आराधना दांडेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर त्यांच्या अनुभवाच्या कमतरतेचा फायदा घेत प्रत्यक्ष सत्तेची दोरे पडद्यामागून मंगेश दांडेकरच हलवतील का, असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित होत आहे. यामुळे उमेदवाराच्या निर्णयक्षमता आणि स्वायत्तकारभाराबाबत शंका निर्माण होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते युवानेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत आराधना दांडेकर नव्या दृष्टीकोनातून नेतृत्व देतील, असा दावा करीत आहेत.


दरम्यान, विरोधकांनी वारसाहक्कावर आधारित राजकारणाचा आरोप करीत या उमेदवारीवर टीका केली आहे. शहरातील नागरिकांचे लक्ष आता आराधना दांडेकर कोणती विकासनीती मांडतात, शहराच्या वाढत्या नागरी समस्यांवर कोणते ठोस उपाय सुचवतात आणि स्वतःचे नेतृत्व किती प्रभावीपणे सिद्ध करतात, याकडे लागले आहे.


आगामी निवडणुकीत मतदार आराधना दांडेकर यांच्या नव्या उमेदवारीला स्वीकारतात की अनुभवाच्या मर्यादांवर प्रश्न उभा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous Post Next Post