अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान २ डिसेंबरला
अलिबाग – अमुलकुमार जैन
अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, येत्या २ डिसेंबरला मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार विक्रम पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची सीलिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून यंत्रांची अंतिम तपासणीही पार पडली आहे. या नगरपालिकेत नगरसेवक संख्या वीस असून, एक उमेदवार प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत १९ नगरसेवक व एका नगराध्यक्षासाठी मतदार रिंगणात उतरले आहेत. नगरसेवकपदासाठी एकूण चाळीस हून अधिक उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे.
नगर परिषद क्षेत्राचे १० प्रभाग तयार करण्यात आले असून, १६,३५४ मतदार नोंदणीकृत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच मतदान कर्मचारी आणि एक पोलिस शिपाई तैनात केले जातील. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक राखीव ईव्हीएम उपलब्ध ठेवण्यात आला असून, मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्वरित पर्यायी यंत्र पुरविण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक तयार आहे.
कायदा-सुव्यवस्थेसाठी अलिबाग पोलिस ठाणे आणि रेवदंडा, मांडवा पोलिस ठाण्याकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक कालावधीत पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात राहतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त गस्त पथके, गाडी तपासणी आणि मोबाईल पॅट्रोलिंग वाढविण्यात आले आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, रॅम्प, प्राथमिक उपचार पेटी, पंखे आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि मदतनीसांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
तहसीलदार विक्रम पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी २ डिसेंबरला मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क नक्की बजावावा. प्रशासनाच्या या व्यापक तयारीमुळे अलिबागमध्ये मतदान सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
