आगरी समाज संस्था अलिबागतर्फे बाल संस्कार वर्गाचा शुभारंभ
अलिबाग (वार्ताहर)
आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने मन:शक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा, शाखा – अलिबाग यांच्या सहकार्याने “विनामूल्य बाल संस्कार वर्ग” या उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश समाजातील बालकांमध्ये चारित्र्य, आत्मविश्वास, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास घडविणे हा आहे.
हा वर्ग गावदेवी मंदिर, रामनाथ तळ्याजवळ, अलिबाग येथे दर रविवारी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत घेतला जाणार असून, ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आगरी समाज संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अनंत म्हात्रे, गावदेवी मंडळाचे श्री शशिकांत गुरव, माजी नगरसेवक श्री राकेश चौलकर तसेच मन:शक्ती केंद्रातर्फे श्री संदीप बाम, श्री विनय आपटे, श्री रविंद्र घरत आणि वर्ग संचालिका सौ. सुप्रिया ठाकूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन आणि संचालन आगरी समाज संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री सुनील तांबडकर, सचिव श्री प्रभाकर ठाकूर, सहसचिव श्री उदय म्हात्रे, श्री मनोहर पाटील, सहखजिनदार श्री राजेंद्र पाटील, श्री श्रेयस ठाकूर यांनी केले.
या वेळी ग्रामस्थ रामनाथ, पालक व बालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या प्रसंगी श्री संदीप बाम यांनी मन:शक्ती प्रयोग केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देत मुलांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि एकाग्रता विकसित करण्याचे महत्व अधोरेखित केले.
सौ. सुप्रिया ठाकूर यांनी बालसंस्कार वर्गाचे उद्दिष्ट व महत्व सांगत पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
श्री श्रेयस ठाकूर यांनी मनशक्ती वर्गातून मिळालेल्या अनुभवांची प्रेरणादायी मांडणी करत मुलांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग संचालिका सौ. सुप्रिया ठाकूर (मो. 9657234482) यांनी केले. त्यांनी आगरी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, समाजातील बालवर्गासाठी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.
आगरी समाज संस्था, अलिबाग ही संस्था गेल्या काही काळापासून बाल, युवा, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे.विवाहमिलन वधू-वर केंद्र, पुस्तक पेढी, नोकरी आणि व्यवसाय मार्गदर्शन, आदिवासी वाडीवर कार्यक्रम, पर्यावरण संवर्धन उपक्रम या माध्यमातून संस्था सतत समाजातील बांधिलकी जपत आहे.“बाल संस्कार वर्ग” हा उपक्रम या सर्व प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असून, मुलांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास, एकाग्रता, जबाबदारी आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
