Home

चोंढी येथील मारहाण प्रकरणी दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 जणांना सात वर्षांची सक्तमजुरी

 चोंढी येथील मारहाण प्रकरणी दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 जणांना सात वर्षांची सक्तमजुरी



अलिबाग (प्रतिनिधी)


 काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेले दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वीची चोंढी येथील मारामारी भोवली असून, त्यांना सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांची शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेंद्र डी. सावंत यांनी सुनावली आहे. भोईरांवर हाफ मर्डर आणि मारामारी असे गुन्हे दाखल होते.  25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतचा निकाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. दरम्यान, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच आधीच भोईरांना शिक्षा झाल्याने त्यांना निवडणूक लढविता येणार की नाही याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. 

प्रकरण काय?

काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम आणि त्यांच्या साथीदारांना नोव्हेंबर २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती जिल्हा परिषदेचा सभापती असताना पोलीस कोठडीत जाणारे भोईर हे रायगड जिल्हा परिषदेचे पहिले सभापती ठरले होते. 

११ सप्टेंबर २०१२ रोजी चोंढी येथे किरकोळ वादातून काँग्रेसचे विजय थळे, त्यांच्या पत्नी रूपाली थळे आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना शेकापचे दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पावणेदोन महिने दिलीप भोईर उर्फ छोटम हे पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर  छोटम जिल्हा न्यायालयाला शरण आले होते. जिल्हा न्यायालयाचे तत्कालीन सत्र न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्यासमोर सभापती छोटम आणि त्यांचे सहकारी मकरंद भोईर, विक्रांत कुडतरकर, विवेक कुडतरकर, शिशिर म्हात्रे, संतोष साळुंखे, जयवंत साळुंखे हजर झाले. या सातही जणांचा अटकपूर्व अंतिम जामीन न्यायालयाने फेटाळला होता.

Previous Post Next Post