मुंबईतील 26/11च्या दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हिरो ठरलेला माजी एनएसजी कमांडोला ड्रग्ज रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक
जयपूर(प्रतिनिधी)
26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हिरो ठरलेला माजी एनएसजी कमांडो गोत्यात आला आहे. राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथक आणि अंमली पदार्थविरोधी कार्यदल यांनी बजरंग सिंग यांना अटक केली आहे. ते गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी घोषित केलं आहे.
गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री चुरु येथून सुमारे 200 किलो गांजासह बजरंग सिंग यांना अटक करण्यात आली. ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजाची तस्करी करुन राजस्थानमध्ये अवैध ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 'ऑपरेशन गांजनेय' अंतर्गत दोन महिने तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर खबऱ्यांच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण अटक करण्यात आली. बजरंग सिंग हे मूळचे राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील करंगा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आपले शिक्षण सोडून देशाची सेवा करण्यासाठी सीमा सुरक्षा दलात (BSF) प्रवेश केला होता. त्यांच्याकडे असलेल्या कुस्तीच्या कौशल्यामुळे आणि त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा दलात (NSG) झाली. एनएसजीमध्ये त्यांनी सात वर्षे विविध दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या सात वर्षांच्या कार्यकाळात, 2008 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या कमांडोमध्ये त्यांचा समावेश होता. 2021 मध्ये एनएसजीमधून निवृत्त झाल्यानंतर बजरंग सिंग यांनी स्थानिक राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी नंतर अवैध आणि गुन्हेगारी कारवायांकडे आपला मोर्चा वळवला. मोठ्या प्रमाणावर गांजा तस्करीमध्ये त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर, पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यांच्यावर 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. बजरंग सिंग हे अत्यंत सावध आणि हुशार गुन्हेगार म्हणून ओळखले जात होते. ते पोलिसांपासून वाचण्यासाठी वारंवार आपली ठिकाणे बदलत असत. त्याचबरोबर, ते मोबाईल फोनचा वापर क्वचितच करत असत, जेणेकरून त्यांचे लोकेशन ट्रेस होऊ नये आणि ते पोलिसांच्या नजरेत येऊ नयेत.