Home

जिल्ह्यातल्या तरुणांना जिल्ह्यातच रोजगार- राजाभाई केणी


 जिल्ह्यातल्या तरुणांना जिल्ह्यातच रोजगार- राजाभाई केणी

 तरुणांमध्ये बदल घडवण्याची शक्ती; शिवसेनेनेच्या रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद 

अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) 

 विशाल युवाशक्तीच्या सामर्थ्यावरच आपल्या जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. आजचा तरुण हा केवळ नागरिक नाही, तर तो समाजाचा आधारस्तंभ आणि भावी शिल्पकार आहे. या तरुणांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे, तसेच बदल घडवून आणण्याचीही ताकद आहे; मात्र, दुर्दैवाने राजकारण्यांच्या यापुर्वीच्या चुकीच्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यातील तरुण रोजगाराअभावी दुसरीकडे स्थलांतर करीत होते. ही स्थिती आता बदलणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी पोयनाड येथे आयोजीत रोजगार मेळाव्या दरम्यान उपस्थित उमेदवारांना दिली. 

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यास ४० नामांकीत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यात ६ हजार तरुणांनी ऑनलाईन अर्ज केला तर ३ हजाराहुन अधिक तरुणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन मुलाखती दिल्या. यावेळी कामगार नेते दिपक रानवडे, युवासेना तालुकाप्रमुख संदेश थळे, कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी आदी मान्यवर उपस्थित होते.  रायगड जिल्ह्यात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार मेळावा होता, असे म्हणणे उपस्थित राहिलेल्या तरुणांचे होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले की, युवा वर्गात प्रचंड ऊर्जा, नवीन दृष्टीकोन आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि सामाजिक सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात ही पिढी मोठे आणि निर्णायक बदल घडवण्यास सज्ज आहे. तरुणाईने आपले लक्ष केवळ व्यक्तिगत प्रगतीवर न ठेवता, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाच्या ध्येयांवर केंद्रित करणे आवश्यक आहे. सध्याच्या तरुणाईसमोर बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास अशा काही गंभीर समस्या आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या स्व. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन आम्ही अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आलेलो आहोत. जेएसडब्ल्यु कंपनीच्या जनसुनावणी दरम्यानही आम्ही रोजगाराच्या मुद्यावर प्रकल्पाला पाठिंबा दिला. तरुण पिढीच्या हाताला रोजगार मिळवून देणे गरजेचे असल्याचे राजाभाई केणी यांनी सांगितले. तर प्रमुख शिवसेना नेत्या मानसी दळवी यांनी निटनेटक्या आयोजनाबद्दल राजाभाई केणी, रसिका केणी आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. जिल्ह्यात कुशल कारागिरांची कमतरता नाही, परंतु येथील तरुण-तरुणींना कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुढील रोजगाराच्या संधींपासून वंचित रहावे लागते. यामुळे जिल्ह्यातील उद्योगांनी येथील उमेदवारांना ही संधी द्यावी, असे आवाहन मानसी दळवी यांनी केले. या मेळाव्यात मुलाखती दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्ती पत्रे देण्यात आली.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले

Previous Post Next Post