Home

श्री कृष्णार्पणमस्तु.... लेखिका अनिता गुजर


 ।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।


माणसाचा स्वभाव चंचल आहे.त्याला त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचं अप्रूप असतं.कधी एकदा तिला मिळवितो असं त्याला झालेले असते.  प्रत्येक स्त्रीला हवी असते अशीच एक पाठीशी राहाणारी..मन जपणारी भावना ती स्वत: जरी कणखर असली तरी तिच्या कणखरतेला अजुन कणखर करणारी..तिच्या विचारांना धार देणारी ही बळकट भावना आणि ती भावना म्हणजे कृष्ण..मग मीरेच्या निष्काम भक्तीला ओ देणारा कृष्ण असो किंवा मधुरा भक्तीत रंगलेला श्रीरंग असो..दोन्ही रुपे स्रीच्या जवळची. निष्काम निष्कलंक प्रेम, निष्काम भक्ती म्हणजे फक्त श्रीकृष्ण. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला, अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा,.एक हक्काचा सवंगडी पाहिजे.आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवा.कृष्ण आणि राधा ,किंवा गोप गोपिका यांच्या रासरंगात कुठलीही शारीरीक आसक्ती नव्हती तर परमात्म्याशी आत्म्याचे तादात्म्य पावण्याची भावना होती. .कृष्ण एक भावना आहे . प्रत्येक स्त्रीचा पाठीराखा आहे तो..ती भावना त्या कोवळ्या बालमनाला फ़ुलायला शिकवते ,तारुण्यातल्या भावनांना हळुवार खुलवते आणि वेदनांमध्ये ही सुखावते. ह्या संसाराच्या चक्रातही शीतल वाऱ्यासारखी मनाला आल्हादून जाते.म्हणूनच म्हणावेसे वाटते.....

*या जीवनी सर्वस्व तू*

*वसंत मी वर्षाच तू*

*मंदिरी या देवता तू*

*अंतीचा हा विश्वास तू*


।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।


हिरकणी सौ.अनिता गुजर

डोंबिवली

Previous Post Next Post