Home

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ: आदर्श मराठी व्याकरण आणि लेखन-गणेश शेलार



स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ: आदर्श मराठी व्याकरण आणि लेखन-गणेश शेलार

 ‘आदर्श मराठी व्याकरण व लेखन’ हे डॉ.दीपक सूर्यवंशी सर व डॉ.श्रीकांत पाटील सर यांनी लिहिलेलं पुस्तक मराठी भाषा प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, भाषेचे अभ्यासक, पत्रकार बांधव, लेखक, कवी आदिंसाठी उपयुक्त असून भाषेची परिमाणकारीकता समजण्यासाठीचे लेखन या पुस्तकांत केलेले आहे. भाषेचे व्याकरण म्हणजे तिच्या वापरासंबंधी अनुसरावयाचे संस्कार,शास्त्र. आणि हे शास्त्र वापरुन उच्चारलेली भाषा यातून त्याची प्रगल्भता दिसून येते.मराठी भाषा ही प्राचीन भाषा असून ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून ह्या भाषेचा वापर केलेला दिसून येतो. आद्य कवी मुकूंदराज यांचे ‘विवेकसिंधू’ महानुभाव पंथांचे संस्थापक श्री.चक्रधर स्वामी यांच्यावरील चरित्र लेखन, हेच प्रमाणक वापरुन नुकताच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा प्राप्त झाला. हीची जननी संस्कृत भाषा असली तरी देव भाषा संस्कृतचं हे गोंडस अपत्य जगात १९ व्या क्रमांकावर वर्णिलं जातं. देशात हीचा वापरण्याचा स्थानांक चौथ्या क्रमांकावर आहे.आईच्या मुखातील भाषा, जात्याच्या ओवीद्वारे आलेली भाषा, संतांच्या लेखनातून वाढलेली मधूरता मराठीची गोडवी अवीट करणारी आहे. पण ही भाषा वापरण्यासंबंधीचे एक शस्त्र आहे. संस्कार आहे. काही नितीनियम आहे ते जाणून मराठीचा वापर केला तर सदर भाषेचं आरसपाणी सौंदर्य दिसते. भाषा वापरण्यासाठीचे मुलभूत नियम प्रा. डॉ.दीपक सुर्यवंशी सर व डॉ.श्रीकांत पाटील सर या द्वयींनी अतिशय मेहनत घेऊन भाषा विषयक नियम ‘आदर्श मराठी व्याकरण व लेखन’ या पुस्तकांत केलेले असून सदर लेखन म्हणजे ऐश्वर्यसंपन्न मराठीच्या अंतरंगात घुसण्यासाठीचा दीपस्तंभ आहे. यापूर्वी भाषा अभ्यासकांनी मराठी भाषा व्याकरणाचे नियम प्रसिध्द  केले त्यात मोरो केशव, गंगाधर शास्त्री फडके, तर्खडकर, वाळींबे आदी यांनी तपशीलवार चिंतन करुन तिच्या वापरासंबंधीचे महत्व पटवून दिले पण मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर पुन्हा व्याकरण विषयक सखोलपणे प्रसिध्द होणारी नियमावली माझ्या माहितीप्रमाणे हे पहिलेच लेखन असावे. या लेखनात भाषेचा उगम, इतिहास, वापरात असलेली लिपी इ. माहिती सखोलपणे नमूद असून ही माहिती प्रत्येक भाषांप्रेमींनी संग्रही ठेवावी अशीच आहे. प्रस्तुत लेखनात वर्णमाला,स्वर आणि व्यंजन, नाम,सर्वनाम,क्रियापद, विशेषण, अव्यये, प्रयोग, काळ,संधी,विभक्ती व प्रकार, समास, लिंग, वचन, वाक्प्रचार, समूहवाचक शब्द, समाजातील प्रचलित म्हणी, विविध चिन्हे, वाक्प्रचार, इत्यादी बाबीं तपशीलवार व सखोलपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे नियम आत्मसात करुन त्याचे प्रयोगार्थ पालन करताना व्यवहारातील भाषेच्या चुका ज्यांच्या लक्षात येतात तो परीपक्व आस्वादक अन्यथा या नियमां शिवाय आपण उच्चारतो ते शब्द, वाक्ये यातील असंख्य चुका सहसा कुणाच्या निदर्शनास येत नाही. भाषेचे नियम पाळून उच्चारलेली वाक्ये ही त्याचा दर्जा स्पष्ट करते. आणि ही बाब अगदी अडाणी माणसांच्या देखील ठळकपणे लक्षात येते.व्यवहारात बरेचदा अनेकांकडून अज्ञानातून चुकीची व अशुध्द भाषा उच्चारली जाते. अशा वेळी भाषेची अवनती होत असल्याचे दिसून येते. शासनाने भाषेच्या उन्नतीसाठी मातृभाषा धोरण आखुन तिच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न यापूर्वी केले गेले असले तरी ते ‘आदर्श मराठी व्याकरण व लेखन’  यामध्ये दिलेल्या सखोल ज्ञाना अभावी निष्फळ व पोकळ असेच आहे. लिहित्या हातांनीच हे नियम आत्मसात करावे का असा प्रश्न उपस्थित होत असताना त्याचे उत्तर नाही असेच आहे कारण जोवर वाचकांना भाषा वापराचे शास्त्र (व्याकरण नियम) आत्मसात होत नाही तोवर भाषेने प्रगतीकारक उंची गाठली असे म्हणता येणार नाही. कारण वाचक हा परीक्षक असतो आणि वाचना दरम्यान त्याला लेखानातील चुका हे शास्त्र अवगत असताना निदर्शनास आणून देत असेल तरच भाषेची घोडदौड सुरु आहे हे लक्षात येते.एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे बाबतचा दीर्घकालीन लढयाला नुकतेच यश आले. पण ते यश सर्वच मराठी भाषकांनी चिरकाल टिकविण्यासाठी  सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाचन-लेखन चळवळींतून मोठ्या प्रमाणावर भाषेची समृध्दी येते, मोबाईल फोन सारख्या अत्याधुनिक (जगाशी थेट कनेक्ट) साधनांचा यामध्ये प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो पण त्यासाठी जिज्ञासा निर्माण होणे आवश्यकतेचे आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवले तर तीजवरील प्रेम वृध्दिंगत होते आणि यातूनच भाषिक अस्मिता वाढते. यापूर्वी सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने बहाल केलेला असून मराठी ही सातव्या क्रमांकाची भारतीय भाषा असून महत्प्रयासाने आणि कठीण कसोटीवर मराठीला अभिजाततेचा दर्जा प्राप्त झाला. आताच्या वाचकांना मराठीचे कसलेलेपण पुन्हा उदृत करण्याची आवश्यकता आहे. संतांच्या अभंगवाणीची भूरळ सार्या जगाला आहे. विविध पौराणिक कथा ह्या माय मराठीतून अनेक पिढ्यांत दिशादर्शक ठरल्या आहे. कालानुक्रमे संत एकनाथांचे ‘भारुड’ ‘एकनाथी भागवत’ संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अर्थात ‘भावार्थ दीपिका’ संत नामदेवांची ‘अभंगवाणी’ संत जनाबाईंच्या ‘ओव्या’ संत चोखोबा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ‘गाथा’ महाराष्ट्रील अनेक थोर संत यांचा साहित्याच्या फुललेला बागेतील तजेला अद्यापही टवटवीत आहे. तद्वतच छत्रपतींच्या दरबारातील व बारा मावळ प्रांतातील भाषेची अटकेपारची मुलूखगिरी, आणि आलिकडील बहिणाबाईच्या कवितांची मोहिनी अद्याप वाचकांवरती कायम आहे. पण हे सर्व अनुभववायचे असेल तर मराठी भाषा शास्त्राच्या चौकटीतूनच म्हणजे व्याकरण विषयक नियम समजून घेतल्यानंतरच तीची महती कळू शकेल. मला वाटतं भाषा समजण्यासाठी ‘आदर्श मराठी व्याकरण व लेखन’ हे वाचकांनी समजून घेतले तर वाचकांची उत्तम प्रकार अभिवृध्दी होऊ शकेल आणि डॉ.दीपक सुर्यवंशी सर व डॉ.श्रीकांत पाटील सर यांनी त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम सार्थकी लागेल...


श्री गणेश शेलार

(वाचक)

छत्रपती संभाजीनगर


Previous Post Next Post