Home

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; ३४४.३० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी


लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार; ३४४.३० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जारी 

मुंबई(वार्ताहर)

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे. त्यामुळं ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी  344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचं शासन निर्णयात म्हटलं आहे. महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 13 हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.  

लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. त्यामुळं आता लवकरच राज्य सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या लाभाच्या वितरणाची तारीख आणि सविस्तर माहिती दिली जाऊ शकते. एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत असल्या तरी दुसरीकडे महिला व बाल विकास विभागाकडून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे 26 लाख महिलांची गृहचौकशी केली जाणार आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. ज्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक म्हणजे तीन महिला लाभ घेत असतील, त्याकुटुंबातील एका महिलेचा आर्थिक लाभ बंद करण्यात येणार आहे.  


Previous Post Next Post