Home

माझं कुंकू माझा देश’चा जाज्वल्य हुंकार; ठाकरेंच्या शिवसैनिकांचा पाकिस्तानविरुद्ध एल्गार


 ‘माझं कुंकू माझा देश’चा जाज्वल्य हुंकार; ठाकरेंच्या शिवसैनिकांचा पाकिस्तानविरुद्ध एल्गार


अलिबाग (ओमकार नागावकर)


आशिया कप 2025 मधील भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला, तरी महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे. पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा हात उघड झाल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून, अशा रक्तरंजित पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा शहिदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचा ठाम सूर उमटू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘माझं कुंकू माझा देश’ या राज्यव्यापी आंदोलनाचा जाज्वल्य हुंकार देत पाकिस्तानविरोधी एल्गार पुकारला आहे. अलिबाग येथे या आंदोलनाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. महिला आघाडीच्या महिला अग्रभागी उभ्या राहून भाजप कार्यालयासमोर कडकडीत निदर्शने केली. या वेळी रायगड महिला संघटिका शिल्पा घरत, उपजिल्हा संघटिका दर्शना पाटील, विधानसभा तालुका संघटिका तनुजा पेरेकर, मुरुड तालुका संघटिका राजश्री मिसाळ, अलिबाग उपतालुका संघटिका लीना घरत, अलिबाग शहर संघटिका राखी खरवले, चौल ग्रामपंचायत माजी सरपंच रूपाली म्हात्रे, मुरुड विभाग प्रमुख मनाली पाटिल, ग्रामपंचायत सदस्य जागृती पिटकुर, संचिता भोईर आणि अलिबाग उपशहर प्रमुख सलोनी गिरी या सर्वजणींचा अग्रणी सहभाग होता.

रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालयातून भव्य मोर्चा काढला आणि थेट भाजप कार्यालयासमोर “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “माझं कुंकू माझा देश” अशा प्रखर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनाच्या ठिकाणी संतापाची लाट ओसंडून वाहत होती.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की, पाकिस्तान सतत भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करतो. अशा देशाशी क्रिकेट खेळणे हा शहिदांच्या रक्ताचा अपमान आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तानशी सामना खेळू नये. केंद्र सरकारने या संदर्भात ठोस भूमिका घेत देशाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मानून निर्णायक पावले उचलली पाहिजेत.

आज राज्यभर पेटलेलं ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन हा केवळ क्रिकेट सामन्याला विरोध नसून, शहिदांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी केलेला जाज्वल्य हुंकार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागेत शिवसैनिकांचा लढाऊ उत्साह पाहून पाकिस्तानविरोधी भूमिकेचा ठाम संदेश देशभर पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे.

Previous Post Next Post