एकतर्फी सामन्यात भारताने पाकड्यांची केली धुळधाण; टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये टॉपर
दुबई(वृत्तसंस्था)
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या या ऑपरेशन सिंदूरच्या पुढच्या भागामध्येही भारत यशस्वी ठरला. भारताने जगासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आणि मैदान कोणतेही असो, सरस कोण आहे हे सर्वांना दाखवून दिले. पहिल्या चेंडूपासून भारताने पाकिस्तानवर अंकुश ठेवला आणि त्यामुळेच भारताला पाकिस्तानला सर्वांसमोर धुळ चारता आली.
आशिया कपच्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला धुळ चारली. रविवारी झालेल्या या रोमांचक लढतीत भारताच्या खेळाडूंनी सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानवर एकतर्फी मात केली. आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी अचूक आणि जबरदस्त माऱ्याने पाकिस्तानला केवळ 127 धावांवर रोखले. यानंतर भारताच्या फलंदाजांनी सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत विजय सोपा केला. त्यांच्या दमदार खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडिया आता ग्रुप ‘ए’च्या पॉइंट्स टेबलवर टॉपर आहे.
टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. पाकिस्तानची टीम ऑलआउट होण्यापासून जरी वाचली, तरी 9 गडी गमावून फक्त 127 धावांचाच आकडा गाठू शकली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा पहिला विकेट पडला आणि तिथून सुरू झालेली विकेट्सची पडझड थांबायलाच तयार नव्हती. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा सलामीवीर साहिबजादा फरहानने केल्या. त्याने 44 चेंडूत 40 धावा करताना काही वेळ पाकिस्तानला सावरायचा प्रयत्न केला, पण अखेर तो कुलदीप यादवच्या फिरकीत फसला. याशिवाय पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना शून्यावर माघारी परतावे लागले. एक वेळ अशी आली होती की 100 धावांचा टप्पा पार करणेही कठीण वाटत होते. मात्र अखेरच्या टप्प्यात शाहीन शाह आफ्रिदीने फटकेबाजी करत 16 चेंडूत 33 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला कसाबसा बचाव करता येईल असा टप्पा गाठून दिला.